वैजापूर बाजार समिती निवडणूक महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने लढणार

शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये मात्र जमेना 

वैजापूर ,३१ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होऊ घातलेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकांना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तिन्ही पक्षांनी ही निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट व भाजप या राज्याच्या सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी भाजपमधील एक मोठा गट या निर्णयाविरोधात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

वैजापूर बाजार समितीसाठी 30 एप्रिल रोजी मतदान होत असून त्यासाठी 27 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. बाजार समितीच्या या निवडणुकीत युती – आघाडी करण्यासंदर्भात राजकीय पक्षाच्या बैठकावर बैठका सुरू आहे. राज्यात शिवसेना व भाजप युतीचा जो फॉर्म्युला आहे त्यानुसारच ही निवडणूक लढविली जाणार आहे. तसा पक्षादेशही आहे. त्यामुळे अन्य कुणासोबत जाण्याचा प्रश्नच नाही असे आ. रमेश पाटील बोरणारे  व भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी हे सांगत असले तरी भाजपमधील एक गट शिंदे गटाबरोबर युती करण्याच्या विरोधात असून हा गट महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याचीही चर्चा सुरू आहे. भाजपमधील हा नाराज गट महाविकास आघाडीच्या संपर्कात असून  महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ही ठरला आहे. 18 जागांपैकी 6 जागा शिवसेना उध्दव ठाकरे गटाला, 4 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला, 4 जागा काँग्रेसला तर चार जागा भाजपमधील नाराज गटाला असा हा फॉर्म्युला असल्याचे समजते.

दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज पाचव्या दिवशी तालुक्याचे माजी आमदार स्व.आर.एम. वाणी यांच्या स्नुषा अनिताताई देविदास वाणी यांनी महिला राखीव मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 3 एप्रिल 2023 ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.