अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, सावत्र बापाला जन्मठेपेची शिक्षा

औरंगाबाद ,२२ जून /प्रतिनिधी :-स्वत:च्या अल्पवयीन सावत्र मुलीवर वारंवार अत्याचार करणा-या कामेश जगन मते याला भारतीय दंड विधान आणि बाल अत्याचार लैंगिक प्रतिबंध कायद्यातील विविध कलमांतर्गत दोषी धरुन जन्मठेपेची शिक्षा व एकुण पाच हजार रुपये दंडाची शिक्षा पोस्को कायद्याचे विशेष न्यायाधिश ए. एस. खडसे यांनी आज दिली.
कामेश याच्याशी विवाह केलेल्या विवाहितेचा पहिल्या पतीपासून एक मुलगी व एक मुलगा आहे. मुले अल्पवयीन असून दोघे आईसह सावत्र वडिलांकडे रहात होते. आई कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर सावत्र वडिल कामेश हा घरात येऊन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करीत असे. तुला व तुझ्या भावाला घरातून हाकलून देईन अशी धमकी देऊन कामेश आपल्या अल्पवयीन सावत्र मुलीवर वारंवार अत्याचार करीत असे. मात्र तरीही एके दिवशी छळास वंâटाळून तिने आपल्या आईकडे तक्रार केली. त्यानंतर आईच्या मदतीने तिने दिलेल्या फिर्यादीवरुन पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
न्यायालयात प्रकरणाची सुनावणी झाली असता सरकारी वकील अरविंद बागुल यांनी एकुण पाच साक्षीदार तपासले. विशेष म्हणजे आरोपीच्या वकिलांनी घेतलेल्या उलटतपासणी दरम्यान पीडित मुलगी आणि तिची आई हे फितूर झाले. अ‍ॅड्. बागुल यांनी अन्य साक्षीदार तपास अधिका-यांच्या साक्षीतून गुन्हा घडल्याचे सिध्द केले. वैद्यकीय अधिका-यांच्या साक्षीतून लैंगिक अत्त्याचार झाल्याचे सिध्द केले. आणि मुख्यध्यापिकेच्या साक्षीतून पीडिता अल्पवयीन असल्याचे सिध्द केले. वैद्यकीय पुरावा आणि परिस्थितीजन्य पुरावा या आधारे विशेष न्यायाधिश ए. एस. खडसे यांनी कामेश याला शिक्षा ठोठावली. या प्रकरणी त्यांना सहाय्यक पोलीस निरिक्षक एस के खताने, रामदास सुरे आणि कायंदे यांनी सहकार्य केले.