योग दिन जिल्हा न्यायालयात साजरा

औरंगाबाद : जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रम जिल्हा न्यायालयात उत्साहात पार पडले.

            जिल्हा न्यायालयात योग प्रशिक्षण शिबिर झाले. या कार्यक्रमामध्ये प्रमुख, जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.जी. खोबागडे तसेच सर्व न्यायाधीश, जिल्हा वकील संघाचे सदस्य तसेच न्यायालयीन कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या शिबिरास आर्ट ऑफ लिव्ह‍िंग संस्थेच्या नेहा सुरेश बेदमुथा यांनी योग प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना योग प्रात्याक्षिके दाखवून मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे तसेच सर्व न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली प्र. फडणीस, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. संतोष पां. पाथ्रीकर, जिल्हा वकील संघाचे सचिव ॲड. अशोक मुळे यांची उपस्थिती होती.

            हर्सुल कारागृहात महिला व पुरुष बंद्यांसाठी विशेष योग शिबिर पार पडले. महिला बंद्यासाठी रजनी कमलाकर तांदुळजे, ॲड. पौर्णिमा साखरे यांनी योग प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना योग प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले. पुरुष बंद्यासाठी जिल्हा वकील संघाचे ॲड. कमलाकर तांदुळजे यांनी योग प्रशिक्षक म्हणून उपस्थित राहून उपस्थितांना योग प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले. महिला व पुरुष बंद्यांनी या योग प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

            शासकीय महिला राजगृह ( सावित्रीबाई वसतीगृह, औरंगाबाद) येथे महिलांसाठी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने सकाळी 7.30 वाजता योग शिबिर घेण्यात आले.  या शिबीरात ॲड. समीक्षा सौदे व ॲड. सारिका पुरी यांनी उपस्थित महिलांना योगाचे प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शनपर शिबिर घेतले.

            जिल्हा न्यायालय, औरंगाबाद येथे जागतिक योग दिनाच्या निमित्ताने दुपारी दोन वाजता जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने” स्ट्रेस मॅनेजमेंट थ्रू योगा” या विषयावर औरंगाबादेतील योग शिक्षिका चारुलता रोजेकर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे तसेच सर्व न्यायाधीश, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव वैशाली प्र. फडणीस जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अशोक मुळे यांची उपस्थिती होती.