संकटाच्या काळात आपल्याला इतिहास घडविण्याची एकप्रकारे संधी-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी  सुनील चव्हाण रूजू

Displaying 1.JPG

औरंगाबाद, दि. 17 : महावितरण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद सहव्यवस्थापकीय संचालकपदी असलेले सुनील चव्हाण यांनी आज प्रभारी जिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये या संकटावार मात करण्यासाठी  आपल्या सर्व यंत्रणांचा योग्य वापर झाला पाहिजे. त्यामुळे या संकटाच्या काळात आपल्याला इतिहास घडविण्याची एकप्रकारे संधी  असल्याचे सुनील चव्हाण म्हणाले.

बीड जिल्ह्यातील आष्टी येथील सुनील चव्हाण यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून मृद आणि व्यवस्थापन या विषयातून विशेष प्राविण्यासह एमएससी पूर्ण केले आहे. त्यांनी मंत्रालय मुंबई येथे उपसचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. तसेच ठाणे महानगर पालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून देखील साडे तीन वर्ष काम पाहिले आहे. यावेळी ठाणे महापालिकेत स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त आयुक्त  म्हणूनही काम करताना पाच हजार 500 कोटी रूपयांचा अर्थसंकल्पाचा मसुदा तयार करून 150 पेक्षा जास्त योजना राबविल्या आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त म्हणून 18 हजारांपेक्षा जास्त बेकादेशीर व अवैध बांधकामांवर कार्यवाही केली आहे. यामुळे  दोन हजार 500 कोटी किंमतीची 75 हेक्टर नागरी जमीन नागरी सुविधांसाठी उपलब्ध झाली. प्रस्तुत विषयाचे सादरीकरण राष्ट्रपती यांना दि. 4 ऑगस्ट 2017 रोजी करण्यात आली असून या संदर्भातील चित्रफित युट्युबवर उपलब्ध आहे. ठाणे येथे सन 2015-18 या कालावधीत 5 लाख वृक्ष लागवड (ग्रिनिंग अप ठाणे अंतर्गत) व संवर्धन केले.

तसेच  महिला, बालक व विशेष कौशल्य असणाऱ्या व्यक्तींसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी,  निराश्रित मुलांच्या शिक्षणासाठी सिग्नल शाळा प्रस्थापित केल्या तसेच दूर  शिक्षण व्हर्च्युअल वर्ग सुरू केले, स्तनपान कायद्याच्या प्रचार व प्रसारासाठी हिरकणी योजनेच्या अंमलबजावणीत पुढाकार घेतला. लातूर भूकंप पीडित बीपीएल लाभार्थ्यांच्या पुनर्वसन कार्यात सक्रिय सहभाग आदींसह स्वच्छता, रोजगार, पर्यावरण, निवडणूक, आरोग्य आदी क्षेत्रात भरीव व यशस्वी  कार्य केले. जळगाव, नाशिक, नवी मुंबई, मुंबई, पालघर आणि ठाण्यात त्यांनी विविध पदांवर कार्य केलेले आहे. अतिरिक्त आयुक्त ठाणे मनपा, जिल्हाधिकारी रत्नागिरी आणि सहव्यवस्थापकीय संचालक महावितरण, औरंगाबाद यापदी कार्य केलेले आहे.

 चव्हाण यांनी घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पदभार स्विकारल्या नंतर लगेच जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्हाधिकारी हा प्रशासनाचा चेहरा असल्याने आपण सर्वांनी टीम औरंगाबाद म्हणून समन्वयाने काम करुया असा  विश्वास व्यक्त केला. कोरोनाचा प्रसार रोखणे आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढविण्यावर  आपला प्रमुख भर असणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Displaying 4.JPG

यावेळी  जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. निता पाडळकर, महानगरपालीकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, मी मराठवाड्याचा असल्याने येथील परिस्थितीची माहिती आहे. कोरोना परिस्थितीचा सामना करण्यासाठी येथील घाटी, जिल्हा रुग्णालय, महानगरपालीका रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयातील समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.  कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये या संकटावार मात करण्यासाठी  आपल्या सर्व यंत्रणांचा योग्य वापर झाला पाहिजे. त्यामुळे या संकटाच्या काळात आपल्याला इतिहास घडविण्याची एकप्रकारे संधी  असल्याचे सुनील चव्हाण म्हणाले.

Displaying 3.JPG

अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी शहरी भागात तीन  तर ग्रामीण भागात 19 कंटेन्मेंट झोन असून आतापर्यंत एकूण कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या 18801 एवढी आहे. त्यापैकी 13884 रुग्ण बरे झाले तर 589 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 4328 रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती दिली. यावेळी श्री. गोंदावले यांनी  जिल्हा परिषदेद्वारे ग्रामीण भागात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांसंबंधीत डाटा एंट्रीचे कामही चालू असल्याचे सांगितले. कोरोना परिस्थितीची यावेळी घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता श्रीमती येळीकर यांनी कोरोना आजारावर रुग्णालयामार्फत करण्यात येणाऱ्या  उपचार, सेवा, सुविधा, प्लाझ्मा चाचणी आणि उपचार याविषयीची माहिती दिली. तसेच मनपा वैद्यकीय अधिकारी पाडळकर यांनी शहराच्या सहा प्रवेशद्वारांवर शहरात येणाऱ्या नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यात येत असल्याची तसेच इतर उपायोजनांबाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *