राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती

नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गातील सुविधा व कामांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

नागपूर ,४ डिसेंबर  / प्रतिनिधी :-हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव समृद्धी महामार्गास देण्यात आले आहे. त्यांचे नाव देण्यात आलेल्या महामार्गावरून चालण्याचा विशेष आनंद आहे. राज्याच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरेल, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. नागपूर विमानतळाबाहेर आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबरला समृद्धी महामार्गांचे लोकार्पण होणार आहे. हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस असेल, नागपूर ते शिर्डी 520 किमीचा मार्ग सुरू होईल. नागरिकांची या महामार्गामुळे मोठी सोय होईल. नागपूर ते शिर्डी थेट कनेक्टिव्हिटी या महामार्गामुळे मिळणार आहे. देशातला व राज्यातला हा गेमचेंजर प्रकल्प असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प प्रत्यक्षात आला असल्याचे मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. त्यांच्यासमवेत या महामार्गाची उद्घाटनापूर्वी पाहणी करण्याचा विशेष आनंद आहे. समृद्धी महामार्गामुळे 16 ते 18 तासांचे अंतर सहा ते सात तासांवर येणार आहे. मुंबई व नागपूर ही शहरे जवळ येतील, उद्योगधंदे वाढतील. शेतकऱ्यांनाही दळणवळणास मदत होईल. अनेक जिल्हे या महामार्गामुळे जोडले जातील. या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. त्याच मार्गावरुन प्रवास करण्याचा आज वेगळा आनंद आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचा विशेष आनंद आहे. अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प या भागाला समुद्धी देणारा आहे. आमच्या सरकारचा सर्वानाच न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबई-पुणे हा देशातील पहिला अॅक्सेस कंट्रोल असलेला महामार्ग आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प पूर्णत्वास आला. तत्कालीन मंत्री नितीन गडकरी यांनी हा प्रकल्प पूर्णत्वास नेला असल्याचे मुख्यमंत्री बोलताना पुढे म्हणाले.

नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गातील सुविधा व कामांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

शिर्डी :- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. तत्पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली.

नागपूर येथील समृद्धी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा हा पाहणी दौरा सायंकाळी ५ वाजता शिर्डी येथे पोहोचला. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे स्वागत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे-पाटील, सदाशिवराव लोखंडे यांनी केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते.  या दौऱ्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार व अधिकारी सहभागी झाले आहेत. यावेळी कोपरगांव इंटरचेंज येथे आमदार बबनराव पाचपुते, आमदार आशुतोष काळे, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची लांबी ७०१ किलोमीटर आहे. काम पूर्ण झालेल्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याची लांबी ५२० किलोमीटर आहे.  समृद्धी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर आहे. यासाठी कोपरगाव तालुक्यातील १० गावांची जमीन संपादित करण्यात आली आहे. कोपरगांव इंटरचेंज पासून शिर्डीचे अंतर १० किलोमीटर आहे.