वैजापूर तालुक्यातील भऊर सोसायटीच्या सर्वसाधारण गटात 8 जागांसाठी 18 उमेदवारी अर्ज दाखल ; तीन राखीव जागा बिनविरोध

वैजापूर,३० ऑक्टोबर /प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील भऊर विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या निवडणुकीसाठी संचालक मंडळाच्या तेरा जागांपैकी तीन राखीव मतदार संघात एक जागेसाठी प्रत्येकी एक नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे तीन संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र त्यांची अधिकृत घोषणा 16 नोव्हेंबर रोजी होईल. दरम्यान सोसायटीचे सर्वसाधारण गटातील आठ जागेसाठी अठरा जणांनी  उमेदवार अर्ज दाखल केले आहेत.

महिला राखीव प्रवर्गातील दोन जागा करिता तीन महिला उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. येत्या 4 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.त्यानंतर निवडणूक लढतीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. तालुक्याचे राजकारणात भऊर विकास सोसायटीची निवडणूक अंत्यत प्रतिष्ठेची आहे. या निवडणूकीत जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अँड प्रमोद जगताप, शिंदे सेनेचे कल्याण जगताप, माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील गटाचे रावसाहेब भानुदास जगताप, सिताराम जगताप, रविंद्र जगताप आदीसह एकूण 18 जणांनी उमेदवारी दाखल केले आहेत. महिला राखीव प्रवर्गातील दोन जागेसाठी रंजना कचरु कुरकुटे , स्वाती सुधाकर जगताप, मिनाक्षी भरत जगताप यांच्यात चढाओढ आहे.

तीन जागेसाठी प्रत्येकी एक अर्ज…. 

सोसायटीचे १) अनुसूचित जाती / जमाती मतदारसंघात – श्री.बाबुराव सगुण दिवे, २) विमुक्त जाती / भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग – श्री.अजीज अमीर इनामदार ३) इतर मागासवर्गीय मतदारसंघ – संजय भागीनाथ परदेशी यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे त्यांची संचालक पदी बिनविरोध निवड झालेली आहे.