महालगाव येथील ठाकरे गटाचे डॉ. प्रकाश शेळके समर्थकांसह शिंदे गटात

वैजापूर ,२९ मे  / प्रतिनिधी :- शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटातील तीव्र राजकीय संघर्षामुळे चर्चेत आलेल्या वैजापूर तालुक्यातील महालगावात आ.रमेश बोरनारे यांनी ठाकरे सेनेला सुरुंग लावला. ठाकरे गटाचे डॉ. प्रकाश शेळके यांच्यासह नाराज पदाधिका-यांना शिवसेनेत प्रवेश दिल्यामुळे हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटातील पदाधिका-यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशामुळे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व शिक्षण सभापती तथा शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे यांना आ.बोरणारे यांनी मोठा धक्का दिल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजकीय बंडात येथील शिवसेना आमदार रमेश बोरनारे सहभागी झाल्यानंतर माजी सभापती अविनाश गलांडे यांनी तीव्र विरोधाची भुमिका घेतली होती. शिवसेनेचे युवा नेते आ.आदित्य ठाकरे यांच्या वाहन ताफ्यावर दगडफेक प्रकारामुळे महालगावातील दोन्ही शिवसेनेतील राजकीय वाद राज्यभरात पोहचला होता.या भागात शिंदे गट प्रभावी व पर्यायी नेतृत्वाच्या शोधात होते. बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या डॉ.प्रकाश शेळके यांना आ.रमेश बोरनारे यांनी हेरुन त्यांच्यासह समर्थकांना शिवसेनेत प्रवेश दिला. संपत शेळके यांच्या निवासस्थानी हा औपचारिक प्रवेश सोहळा पार पडला . यावेळी बाजार समितीचे संचालक रजनीकांत नजन, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब झिंजुर्डे, मंगेश गायकवाड, रामेश्वर पाटोळे यांची उपस्थिती होती. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणा-या पदाधिकारी व कार्यकर्त्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळयाचे आयोजन येथे करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.