आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव शनिवारी वैजापुरात ; शहरातून मोटारसायकल रॅली

भाजपचे प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांची पत्रकार परिषदेत माहिती 

वैजापूर,३० सप्टेंबर  /प्रतिनिधी :-आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरु केली आहे. लोकसभेचा औरंगाबाद मतदार संघ पक्षाच्या दृष्टीने अधिक मजबुत करण्यासाठी भाजपाचे केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव हे 30 सप्टेंबर ते 1ऑक्टोबर हे दोन दिवस औरंगाबाद लोकसभा प्रवास करणार असून त्याअंतर्गत एक ऑक्टोबर रोजी वैजापुरात येणार आहेत. या दौऱ्यात ते यंत्रणा, नवमतदार, सामाजिक संस्था, सहकारी संस्था, मान्यवर मतदारांचा गट, ऐतिहासिक स्थळांना भेट देणार असून त्यांच्या समस्या, विकासाबाबत अपेक्षा आदींबाबत सुसंवाद साधणार आहेत. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणिस संजय केणेकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. 

भाजपाच्या शत प्रतिशत या अभियानांतर्गत 144 मतदारसंघातुन लोकसभा प्रवास हा उपक्रम पक्षाने हाती घेतला असून त्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांचा दौरा होणार आहे असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासुन देशात मोठे परिवर्तन झाले आहे. लोकशाहीला खऱ्या अर्थाने बळकटी येण्यासाठी मोदी यांनी अभियान सुरु केले असून त्यांच्या विचारा़ची ताकद वाढावी या दृष्टीने हे अभियान राबवण्यात येत आहे. समाजातील उपेक्षित घटकांना सत्तेचा लाभ मिळावा ही नरेंद्र मोदी व पर्यायाने भाजपाची विचारधारा असुन ही या विचारधारेला पुरक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. भुपेंद्र यांच्या दोन दिवसांच्या संघटनात्मक दौऱ्यात औरंगाबाद येथे बैठक होणार आहे. कोअर कमिटीच्या बैठका व तालुका व जिल्हा स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येतील.‌ पक्षाच्या कार्यालयात कसे काम चालते यांचाही आढावा घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाचे जिल्हा सरचिटणिस डॉ. दिनेश परदेशी म्हणाले की वैजापूर शहरात केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी दुचाकी फेरी काढण्यात येईल. तसेच महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मंत्री नागरिकांशी संवाद साधतील. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले.‌ पत्रकार परिषदेला संजय खंबायते, भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य एकनाथ जाधव, तालुका अध्यक्ष कल्याण दांगोडे, प्रशांत कंगले, नबी पटेल, मोहन आहेर, ज्ञानेश्वर जगताप, मजीद कुरेशी, दशरथ बनकर, दिनेश राजपूत, सावन राजपूत, शैलेश पोंदे, ज्ञानेश्वर आदमाने उपस्थित होते. 

औरंगाबादचा उमेदवार कोण?

कुस्ती खेळण्यासाठी सर्वच पहेलवान तयारी करतात. त्यामुळे लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधुन तयार असले तरी उमेदवारीचा अंतिम  निर्णय हा पक्षश्रेष्ठीच घेतील असे केणेकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.