क्रीडा भारतीच्या भारत परिक्रमेत खेळाडूंचा मोठा सहभाग

औरंगाबाद ,२२ मे /प्रतिनिधी :-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्या करिता आज देशभरात २२५ ठिकाणी एकाच वेळी ‘क्रीडा भारती’ च्या माध्यमातून दुचाकी वाहन रॅली काढण्यात आली. औरंगाबादेत झालेल्या या रॅलीमध्ये २५० प्रशिक्षक आणि खेळाडूंनी दणदणीत सहभाग नोंदवत स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन केले.

सकाळी ९ च्या सुमाराला देशातील २२५ ठिकाणांहून ही रॅली एकाच वेळी काढण्यात आली. औरंगाबादेत अध्यक्ष पंकज भरसाखळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीची सुरुवात शहरातील भारत माता मंदिर येथे वंदन करून झाली. या रॅलीचा समारोप वेरूळ येथील शहाजी राजे जन्मस्थळ असलेल्या मालोजीराजे भोसले गढी येथे झाला.

क्रीडा भारतीचे अखिल भारतीय कोषाध्यक्ष मिलिंद डांगे, प्रसिद्ध बाधकाम व्यावसाईक डॉ.सुशील भारूका, इंजिनिअर संतोष पाठक,  उद्योजक दिनेश गंगवाल यांची यावेळी उपस्थित होते. यावेळी मिलिंद डांगे म्हणाले, ‘ही रॅली तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी आहे. या रॅलीच्या माध्यमातून त्यांच्या मनात स्वातंत्र्यसैनिकांप्रती असलेला अभिमान अजून वृद्धिंगत होणार आहे’. डॉ.सुशील भारूक म्हणाले, ‘आपल्या तरुणाईला देशातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्यप्रति माहिती होणे अधिक गरजेचे आहे. ही रॅली ते काम अतिशय चांगल्या पद्धतीने करणार आहे’.

रॅलीतील सर्व व्यवस्था एईव्हीपीएम महिला महाविद्यालय व हेडगेवार रुग्णालयातर्फे करण्यात आली. रॅलीच्या यशस्वीतेसाठी डॉ.मीनाक्षी मुलीयार, विनायक राऊत, डॉ. भरत सलामपुरे, अमृत बिऱ्हाडे, भिकन आंबे, मचिंद्र राठोड, सतीश पाटील, संजय महाजन, संदीप जगताप, प्रशांत जमधडे यांनी परिश्रम घेतले.