लाडगाव शिवारात पेट्रोल पंप व्यवस्थापकाला लुटणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश

3 लाख 29 हजारांचा मुद्देमाल जप्त

वैजापूर, ५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील लाडगाव शिवारात पेट्रोलपंप व्यवस्थापकाची बॅग हिसकावून लूटमार करणाऱ्या टोळीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. टोळीतील तिघांना भोसरी (पुणे) येथे जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून 3 लाख, 29 हजार 960/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

फिर्यादी नामे हारुण मुसाखॉ पठाण (वय 24 वर्ष व्यवसाय- मॅनेजर पेट्रोल पंप लाडगाव, रा. वांजरगाव ता. वैजापुर जि. औरंगाबाद) यांनी दिनांक 31/10/2022 रोजी रोजी पोलीस ठाणे विरगाव येथे फिर्याद दिली की, मी नेहमीप्रमाणे पेट्रोलपंपावर जमा झालेली रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँक लाडगाव येथे सकाळी 11 वाजेच्या सुमारास भरणा करण्यासाठी माझ्या मोटार सायकलवर ब्राउन रंगाच्या सॅकमध्ये घेऊन पेट्रोलपंपावरून निघालो. सदर सॅकमध्ये 4 लाख 07 हजार 360 /- रुपये रोख रक्कम होती. मी रोडने जात असताना माझ्या मागुन एका मोटार सायकलवर तिन अनोळखी इसम हॉर्न वाजवत माझ्याजवळ आले व चालते गाडीवरुन माझ्या मोटार सायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैश्याची सॅक बळजबरीने ओढून त्यांच्या जवळील लाल काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर लाडगावच्या दिशेन पळून गेले. फिर्यादीवरुन विरगाव येथे कलम 392, 34 भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे.

सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करीत असताना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक व तांत्रीक विश्लेषणा आधारे खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे (1) आकाश संजय गायकवाड रा. उकलगांव ता. श्रीरामपुर (2) किरण उर्फ करण नवनाथ गायकवाड रा. निपाणी वडगांव ता. श्रीरामपुर (3) तिलकराज मनमोहनसिंग रा. भोसरी जि.पुणे यांनी केल्याची व तिलकराज हा त्याच्या भोसरी येथील भाड्याच्या खोलीत लपुन बसलेला असल्याची माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचुन तिलकराज राहत असलेल्या आदर्श नगर, मोशी ता. हवेली जि. पुणे येथील भाडयाच्या खोलीवर अचानक छापा मारला असता सदर ठिकाणी वरिल तिघेही इसम मिळून आल्याने त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे (1) आकाश संजय गायकवाड वय 23 वर्ष रा. उकलगांव ता. श्रीरामपुर (2) किरण उर्फ करण नवनाथ गायकवाड वय 24 वर्ष रा. निपाणी वडगाव ता. श्रीरामपुर ह.मु कापुस वाडगाव ता. वैजापुर (3) तिलकराज मनमोहनसिंग वय 24 वर्ष रा. राजासराई ता. देवसर जि. सिंगरोली राज्य मध्यप्रदेश ह.मु. आदर्श नगर, मोशी, ता हवेली जि. पुणे असे सांगितले. नमुद आरोपींना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा करण्याचा कट रचून त्यासाठी बजाज प्लसर मोटार सायकलची चोरी करुन त्या मोटार सायकलवरुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. नमुद आरोपींच्या ताब्यातून गुन्हयातील गेली रोख रक्कम 1,91,960/- रुपये, गुन्हयांत वापरलेली चोरीची बजाज पल्सर मोटार सायकल व तिन मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 3 लाख 21 हजार 960/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच आरोपी क्रमांक 03 याने त्यांचे वाटयाला आलेल्या रकमेपैकी 1 लाख रुपये रुपये बँकेत जमा केल्याचे सांगितल्याने सदरची रक्कम बँकेस पत्र देऊन होल्ड करण्यात आली आहे. नमुद आरोपींना सदर गुन्हयाचे पुढील तपासकामी पोलीस ठाणे विरगांव यांच्या ताब्यात देण्यांत आले असुन पुढील तपास पोलीस ठाणे विरगांव हे करीत आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक मनिष कलवानीया, सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलिस उपनिरीक्षक विजय जाधव, प्रदीप दूबे, सहाय्यक फौजदार सय्यद झिया, पोलिस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत भालेराव, लहू थोटे, संतोष पाटील, पोलिस नाईक शेख नदीम, वाल्मीक निकम, पो.कॉ. रामेश्वर धापसे, आनंद घाटेश्वर, ज्ञानेश्वर मेटे राहूल गायकवाड, संजय तांदळे, संतोष डमाळे, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली.