शिवराई येथे परप्रांतीय महिलेची चिमुकल्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

वैजापूर,२८ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- महिलेने चिमुकल्यासह विहिरीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.28) तालुक्यातील शिवराई येथे उघडकीस आली. संगीता रविन सोळंकी (वय 26) व रणजित रविन सोळंकी (वय 3) अशी मृतांची नावे असून ते मध्यप्रदेशातील बडवणी जिल्ह्यातील सेंधवा येथील रहिवासी होते. मोलमजुरीच्या कामानिमित्त ते वैजापूर तालुक्यातील शिवराई येथे आले होते.

संगीता व रविन सोळंकी हे परप्रांतीय दांपत्य गंगापूर तालुक्यातील अद्रक व्यापारी सोमनाथ गवळी यांच्याकडे अद्रक काढण्याच्या कामावर होते. काही दिवसांपूर्वी ते व इतर मजूर शिवराई येथील अशोक डिके यांच्या शेतात अद्रक काढण्यासाठी आले होते. मंगळवारी सकाळपासून संगीता व त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रणजीत बेपत्ता होता. दरम्यान बुधवारी सकाळी दहा वाजता डिके यांच्या शेत गट क्रमांक 344 मधील शेतातील विहिरीत एका लहान मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपूत, हेडकॉन्स्टेबल किसन गवळी, गणेश पठारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चिमुकल्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढत असतांना संगीता यांचाही मृतदेह विहिरीच्या पाण्यात आढळून  आला. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल किसन गवळी हे करीत आहेत.