वैजापूर- खंडाळा रस्ता ओलांडताना जरुळ शिवारात अज्ञात वाहनाची धडक ; 62 वर्षीय महिला ठार

वैजापूर,१९ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर – खंडाळा रस्ता ओलांडणाऱ्या 62 वर्षीय विवाहित महिलेला अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेने जागीच ठार झाल्याची घटना शनिवारी (ता.17 ) रात्री साडे दहा वाजता जरुळ शिवारात घडली. मालनबाई पोपट मतसागर (वय 62 वर्ष) राहणार जरुळ फाटा ता. वैजापूर जि.औरंगाबाद असे मृत महिलेचे नाव आहे.

वाहनाने धडक दिल्यानंतर घटनास्थळावरुन पसार झाले. जरुळ येथील जनार्दन स्वामी आश्रमात धार्मिक भागवत कथा सप्ताह सुरु होता.मालनबाई या दररोज रात्री कथा ऐकण्यासाठी जात असत शनिवारी भागवत कथा सप्ताहाचे समारोपाचे प्रवचन ऐकून जरुळ फाटा परिसरातील घराकडे वैजापूर -खंडाळा रस्ता त्या ओलांडताना त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिली.गंभीर जखमी स्थितीत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले होते.वैद्यकीय अधिका-यांनी त्या मृत झाल्याचे घोषित केले.या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा नोंदवण्याची कारवाई करण्यात आली असून अधिक तपास बीट जमादार मोईस बेग करत आहेत.