पुरणगाव येथील पुलासाठी 18 कोटींचा निधी मंजूर

वैजापूर,१९ डिसेंबर / प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्याचा पश्चिम महाराष्ट्राला रस्ते मार्गाची दळणवळणाच्या दृष्टीकोनातून सक्षम करण्याचे महत्वकांक्षी भुमिकेतून पूरणगाव ता. वैजापूर – पुणतांबा ता.राहाता येथील गोदावरी नदीपात्रात वाहतूक संपर्क पूल उभारणीसाठी 18 कोटीचा निधीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय वाहतूक मार्ग मंजुरी दिली. केंद्र व राज्य सरकारकडून रस्ते व पुल बांधणी कामासाठी 32 कोटीचा निधी मिळाला आहे.

तब्बल 25 वर्षापासून पुरणगाव ते पुणतांब्याला जोडणारा वाहतूक संपर्क पुलाची निर्मिती करण्याची प्रलंबित मागणी आ. रमेश बोरणारे यांच्या पाठपुराव्यामुळे तडीस लागली आहे. वैजापूर तालुक्याचा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर, शिर्डी, राहाता, राहुरी या तालुक्याशी दळणवळणाचा संपर्क जोडण्यासाठी पुरणगाव ता. वैजापूर येथून पुणतांब्यापर्यत गोदावरी पात्रात वाहतूक पूलाची बांधणी करण्याची मागणी होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाच्या कामाचे अनेकदा सर्वेक्षण केले. मात्र तत्कालीन राज्यकर्त्यांनी मराठवाड्यातील मागास भागाचा पश्चिम महाराष्ट्रातील विकसित भागाशी संपर्क जुळवण्यात राजकीय दृष्टीकोनातून विरोधाचा कायम खोडा घातल्यामुळे हा प्रस्ताव अनेक वर्षापासून धूळखात पडलेला होता.

डोणगाव येथील कोल्हापुरी बंधा-याचे अरुंद भिंतीवरुन पुरणगाव, डोणगाव, बाबतरा, हिंगोणी, कांगोणी, भऊर, डवाळा, खंबाळा, भग्गाव, लाखगंगा येथील शेतकरी, विद्यार्थी, ग्रामस्थ व रुग्णांना जीव मुठीत धरुन वाटचाल करतात. गोदावरीला महापूर आल्यानंतर हा मार्ग बंद पडतो, पाण्याचा जोर  ओसरल्यावर मार्ग सुरळीत होतो. या पुलाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आमदार रमेश बोरनारे यांनी एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय रस्ते विकास निधीतून गोदावरी नदीपात्रात प्रमुख जिल्हा मार्ग 29 पुरणगाव – पुणतांबा येथे वाहतूक पुल बांधण्यासाठी पाठपुरावा केला होता. या कामासाठी 18 कोटीच्या आर्थिक निधीची तरतूद पहिल्या टप्प्यात करण्यात आली तसेच तलवाडा – जानेफळ  – पालखेड रस्ता डांबरीकरणासाठी 10 कोटीचा वेगळा निधी मंजूर करण्यात आल्याचे आ. बोरणारे यांनी सांगितले. 

शिक्षण, कृषी आरोग्य क्षेत्राला चालना मिळेल -आ. रमेश बोरणारे 

गोदावरी नदी पात्रातून पुरणगाव – पुणतांबा येथे मोठया वाहतूक पुलाचे बांधकामामुळे  परिसरातील पंधरा ते वीस गावातील श्रीरामपूर श्रीरामपूर,शिर्डी राहाता रस्ते मार्गाने जलदगतीने गाठण्यासाठी सोयीस्कर ठरेल. तसेच शेतक-यांचा शेतीमाल, दुध पश्चिम महाराष्ट्राच्या बाजारपेठेत पोहचण्याचा अडसर दूर झाल्यामुळे उद्योग शिक्षण, आरोग्य ,कृषी क्षेञाला भरीव चालना मिळण्याचा दावा आ.रमेश बोरणारे यांनी केला.