शहीद अमोल पाटील अनंतात विलीन ; वैजापूर तालुक्याच्यावतीने आ. बोरणारे यांनी वाहिली श्रद्धांजली

वैजापूर ,१८ जानेवारी / प्रतिनिधी :- शेजारच्या नांदगांव तालुक्यातील बोलठाण गावचे सुपूत्र अमोल हिम्मतराव पाटील यांना वीरमरण आले असून, आज सकाळी बोलठाण येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

वैजापूर- गंगापूर मतदार संघाचे शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी त्यांना आपल्या मतदारसंघातर्फे श्रद्धांजली वाहिली.देशाच्या इंडो-नेपाळ सीमेजवळील वीरपूर येथे मुख्यालयी कार्यरत असलेल्या बोलठाण येथील एसएसबी जवान अमोल पाटील यांचे अपघाती निधन झाले.11 हजार केव्ही विजेच्या तारेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. भारतीय निमलष्करी दलात ते कार्यरत होते.त्यांच्या निधनाची बातमी समजताच बोलठाणसह परिसरात शोककळा पसरली होती. दोन दिवस बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. शहीद अमोल पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. शहीद अमोल पाटील यांचे शिक्षण वैजापूरला झाले होते. वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश पाटील बोरणारे यांनी शहीद जवान अमोल पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन वैजापूर तालुक्याच्यावतीने श्रद्धांजली वाहिली.