लोखंडी खांब अंगावर पडून मजूर ठार ; करंजगाव रेल्वेस्थानक जवळील घटना

वैजापूर,१५ जुलै /प्रतिनिधी :- लोखंडी खांब उभारणीचे काम करणाऱ्या मजुराच्या अंगावर खांब पडल्याने मजूर ठार झाल्याची घटना १४ रोजी तालुक्यातील करंजगाव रेल्वेस्थानकालगत घडली. जितेंद्रसिंह समरथसिंह (21) रा. राजपूर ता.जसवंतनगर उत्तरप्रदेश, ह.मु.करंजगाव असे घटनेत ठार झालेल्या मजुराचे नाव आहे.  

करंजगाव रेल्वेस्थानक परिसरात मागील काही दिवसांपासून लोखंडी पोल उभारणीचे काम सुरू आहे. जितेंद्रसिंह हा या ठिकाणी मजूर म्हणून काम करत होता. गुरुवारी सकाळी  नेहमीप्रमाणे तो कामावर हजर झाला. दरम्यान साडेअकरा वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकापासून जवळच असलेली रेल्वेपटरी क्रमांक 72, 73 लगत तो लोखंडी खांब उभारण्याचे काम करीत होता. नेमके याचवेळी त्याच्या अंगावर खांब पडून तो गंभीर जखमी झाला. उपचारार्थ त्याला औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.