नागमठाण येथील बेपत्ता महिला व तिच्या पाळीव कुत्र्याचा विरगाव पोलिसांनी लावला शोध

वैजापूर ,४ जुलै  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथील बेपत्ता झालेल्या एका महिलेसह तिच्या पाळीव कुत्र्याचा शोध लावून वीरगाव पोलिसांनी तिच्या नातलगांच्या सुपूर्द केले.विशेष म्हणजे पोलिसांनी कुत्र्याचा अगोदर शोध लावला व काही अंतरावर महिलाही सापडली. अहमदनगर जिल्ह्यातील वरखेड येथे दोघेही सापडले.  

तालुक्यातील नागमठाण येथील सुनीता अण्णा पवार (वय 25) ही महिला 30 जून रोजी रागाच्याभरात घरातून बेपत्ता झाली होती. तिचा बादल नावाचा पाळीव कुत्रा हा सोबत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने नातलगांना सोबत घेऊन दोघांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला असता वरखेड  (ता. नेवासा जि. अहमदनगर ) येथे प्रथम कुत्रा सापडला. सुनीता पवार ही पोलिसांना तिथे दिसली नाही. परंतु कुत्रा तिथे असल्यामुळे ती आजूबाजूलाच असावी. असा कयास पोलिसांनी बांधत तिचा शोध घेतला असता तीही बाजूलाच सापडली. पोलिसांनी तिची समजूत काढून कसेतरी तिच्यासह कुत्र्याला वीरगाव पोलिस ठाण्यात आणले. तिचा पती अण्णा पवार याला बोलावून पोलिसांनी दोघांनाही त्याच्या स्वाधीन केले.