चीनने 1962 नंतरही बळकावला भारताचा भूभाग ,शरद पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान

सातारा,
भारत-चीन दरम्यान झालेल्या संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पृष्ठभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर आरोप करताना, पूर्वी काय घडले होते, याचाही विचार केला पाहिजे. 1962 च्या युद्धानंतर चीनने भारताचा 45 हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो आजही परत मिळालेला नाही, अशी आठवण करून देतानाच, राष्ट्रीय संरक्षणाच्या मुद्यावर राजकारण करू नका, अशा शब्दांत शरद पवार यांनी राहुल गांधी यांना फटकारले आहे.गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याकडे लक्ष द्यायची गरज नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच, सत्तास्थापनेसंदर्भातील दाव्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. फडणवीस काही ना काही बोलून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी खोचक टीका त्यांनी यावेळी केली.

शरद पवार यांनी आज शनिवारी सातार्‍याला भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर चर्चा केली. भारत-चीन संघर्षावरून सत्ताधारी आणि काँग्रेस दरम्यान सुरू असलेल्या वाक्‌ युद्धावरही त्यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचे कान उपटताना भूतकाळातील घटनांचे दाखलेही दिले. काल-परवा झालेल्या भारत-चीन संघर्षावेळी चीनने भारताचा काही भाग बळकावलाही असावा, किती भूभाग बळकावला हे माहीत नाही, पण 1962च्या युद्धानंतर चीनने आपला 45 हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो अजूनही चीनने सोडलेला नाही. ही गोष्ट आपण विसरू शकत नाही, असे सांगतानाच, जेव्हा आपण आरोप करतो, तेव्हा पूर्वीच्या काळात काय घडले, याचा मी विचार करतो. कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यात राजकारण आणता कामा नये, असा सल्ला पवारांनी राहुल गांधी यांना त्यांचे नाव न घेता दिला.
 

युद्धाची शक्यता मुळीच नाही
चीन-भारत प्रश्न हा संवेदनशील आहे. चीनने गलवान खोर्‍यात कुरापत काढली, हे देखील खरे आहे. मात्र, असे असले तरी भारत-चीन युद्ध होण्याची शक्यता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सियाचीनशी संपर्क साधण्यासाठी आपण गलवान खोर्‍यात रस्ता तयार करीत आहोत. गलवान खोर्‍यात आपल्याच हद्दीत आपण हा रस्ता करीत असून, त्या ठिकाणी हेलिपॅड उभारत आहोत. या रस्त्याचे काम सुरू असताना चीनचे सैन्य रस्त्यावर आले आणि आपल्या सैनिकांसोबत त्यांची झटापट झाली, असे ते म्हणाले.

अपयशाचे खापर संरक्षण मंत्रालयावर फोडणे चूक
1993 मध्ये संरक्षण मंत्री असताना मी चीनला गेलो होतो. त्यावेळी हिमालय सीमेवर सैन्य कमी करण्याबाबत सहा दिवस चर्चा झाली. त्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नरिंसहराव चीनला गेले आणि त्यांनी दोन्ही बाजूचे सैन्य कमी करण्याचा करार झाला. यावेळी हिमालयीन सीमेवर गोळीबार करायचा नाही, असा करार झाला. 93 नंतर 1995 सालीही हाच करार झाला. त्यामुळे गलवान खोर्‍यात गोळीबार झाला नाही. तिथे झटापट झाली. या करारामुळेच या भागात गोळीबार झाला नाही, असे सांगतानाच, रस्त्यावर अतिक्रमण करताना चिनी सैन्याला रोखले, म्हणून झटापट झाली. गस्त घालताना कुणी आडवे आले आणि असा काही संघर्ष झाला तर, संरक्षण मंत्र्यांचे अपयश आहे, असे म्हणून चालणार नाही. ते योग्य नाही. झटापट होते, याचा अर्थच तुम्ही जागरूक होता, असा होतो. नाही तर चिनी सैन्य कधी आले आणि गेले हे कळलेही नसते, असे त्यांनी सांगितले.
 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *