देशाशी कितीवेळा विश्वासघात केला, हे सांगा ?भाजपाध्यक्षांचा सोनिया गांधींना थेट सवाल

नवी दिल्ली, 
चीन आणि काँग्रेस यांच्यातील संशयास्पद संबंधावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत, राजीव गांधी फाऊंडेशनला चीनने देणगी का दिली, असा प्रश्न आज पुन्हा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी उपस्थित केला. आपल्या स्वार्थासाठी देशाशी किती वेळा विश्वासघात केला, हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली.

See the source image

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वा आयोजित पत्रपरिषदेत गांधी घराण्यावर आज लागोपाठ तिसर्‍या दिवशी हल्ला चढवताना नड्डा म्हणाले की, सत्तेत असताना काँग्रेसने कोणकोणती कामे केली, देशाशी कितीवेळा विश्वासघात केला, असा प्रश्न 130 कोटी जनतेला यामुळे पडला आहे.
 
 
भारत चीन सीमेवर निर्माण झालेली तणावाची परिस्थिती, तसेच कोरोनाची साथ याचा फायदा घेत मूळ प्रश्नांपासून पळ काढण्याचा प्रयत्न करू नका, असा सल्ला सोनिया गांधी यांना देत नड्डा म्हणाले की, भारताचे लष्कर आपल्या देशाचे, तसेच सीमांचे रक्षण करण्यात सक्षम आहे आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे.
 
 
काही दिवसांपूर्वी टि्‌वट करीत, मी राजीव गांधी फाऊंडेशनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, आज चिदम्बरम्‌ म्हणतात, फाऊंडेशन हा पैसा परत करेल, जमानतीवर असलेले देशाचे माजी अर्थमंत्री पैसे घेतल्याची कबुली देत आहेत. नियम धाब्यावर बसवून देशाच्या हिताशी तडजोड करीत हे पैसे का घेतले, हे गांधी यांनी सांगावे, अशी मागणी नड्डा यांनी केली.
 
 
चीनसोबतचा भारताचा व्यापारातील तोटा 2004 मध्ये 1.1 अब्ज डॉलर्स होता, 2013-14 मध्ये तो वाढून 36.2 अब्ज डॉलर्स झाला. यासाठी काँग्रेसला ही देणगी दिली का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संकटात सापडलेल्या जनतेला मदत करण्यासाठी असलेल्या पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2005 पासून 2008 पर्यंत राजीव गांधी फाऊंडेशनला आर्थिक मदत का करण्यात आली? देशाच्या जनतेला याचे उत्तर हवे असल्याचे ते म्हणाले.
 
 
संपुआच्या शासनकाळात राजीव गांधी फाऊडेशनला देणग्या देण्यासाठी अनेक मंत्रालय तसेच सेल, गेल, स्टेट बँक आणि अन्य आर्थिक संस्थावर दबाव आणण्यात आला, असा आरोप नड्डा यांनी केला.
 
रामेश्वर ठाकूर संस्थापक असलेले ठाकूर, वैद्यनाथन्‌ अॅण्ड अय्यर कंपनी ही पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीची अनेक वर्ष अंकेक्षण करत होती. रामेश्वर ठाकूर काँग्रेसचे नेते, राज्यसभा सदस्य, तसेच चार राज्यांचे राज्यपाल राहून चुकले होते. काँग्रेस  नेत्याच्या कंपनीकडून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीचे अनेक वर्षे अंकेक्षण करून घेण्यामागे सोनिया गांधी यांचा उद्देश काय होता, अशी विचारणा नड्डा यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *