सीमेवर वाढविणार जवानांची संख्या ,चीनला धडा शिकविण्याची केंद्राची रणनीती
नवी दिल्ली,
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिनी सैनिकांच्या आक्रमकतेला अंकुश ठेवण्यासाठी आपल्या जवानांची संख्या वाढविण्यावर केंद्र सरकारने भर दिला असून, त्या अनुषंगाने भारताने जवानांच्या अतिरिक्त तुकड्या लडाखला पाठविणे सुरू केले आहे. लेह येथील वायुदलाच्या तळावर अपाचे हेलिकॉप्टर्स आणि लढाऊ विमाने देखील तैनात केली आहेत.

लडाखच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर बैठकांचे आयोजन केले जात आहे. मात्र, चीन ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचेच दिसून येत आहे. चर्चेत नरमाईची भूमिका घेऊन, नंतर मात्र हा देश नवीन खेळी करीत असतो. त्यामुळे आता भारतानेही प्रत्युत्तर देण्याची मानसिकता तयार केली आहे.
सीमेवरील स्थिती कशी हाताळायची, यासाठी राजकीय नेतृत्वाला िंकवा आपल्या वरिष्ठांना विचारण्याची गरज नाही. स्थितीनुसार जशास तसे उत्तर द्या, असे अधिकारच केंद्र सरकारने जवानांना दिले आहेत, याशिवाय अमेरिकाही आपल्या सैन्यातील काही तुकडी भारताच्या मदतीला पाठविण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत चिनी सैनिकांना कोणतेही धाडस करणे परवडणारे नसल्याचे सूत्रांचे मत आहे.
एका इंग्रजी दैनिकाने याबाबतचे वृत्त लष्करातील वरिष्ठ अधिकार्यांच्या हवाल्याने आज शनिवारी प्रकाशित केले आहे. भारताचे जवान चीनच्या कोणत्याही आगळीकीला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहेत आणि यासाठीच सीमेवर मोठ्या संख्येत जवान पाठविले जात आहे, अशी माहिती या अधिकार्यांनी दिली.