कॅबिनेट मंत्री सावेंची 20 किमी मिरवणूक:नवी पाणीपुरवठा योजना ​पूर्ण करण्याचे आश्वासन ​

औरंगाबाद,१२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- शिंदे – फडणवीस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी प्रमोशन मिळालेले अतुल सावे यांचे मंत्री झाल्यावर प्रथमच शहरात आगमन झाले. त्यानिमित्त त्यांची चिकलठाणा विमानतळ ते संस्थान गणपती मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी ४.३० वाजता सुरू झालेली ही मिरवणूक चार विधानसभा मतदारसंघांतील २५ ठिकाणी स्वागत स्वीकारून रात्री ११ वाजेच्या सुमारास संपली. सावे यांनी १७०० कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना आणि शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीमध्ये नवीन उद्योग आणणे अशी दोन अत्यंत महत्त्वाची कामे करण्याचे आश्वासन दिले. 

May be an image of 5 people and people standing

 ही मिरवणूक (रॅली) मुकुंदवाडी, रामनगर, सिडको एन-२, जयभवानीनगर, पुंडलिकनगर, जवाहर काॅलनी, उस्मानपुरा, कोकणवाडी, क्रांती चौकमार्गे काढण्यात आली. त्यात १५ ठिकाणी क्रेनने सावेंना हार घालण्यात आला. औरंगाबाद मनपाच्या आगामी निवडणुका लक्षात घेता सावेंच्या रॅलीचा मार्ग फुलंब्री, औरंगाबाद पूर्व, मध्य, पश्चिम अशा चार विधानसभा मतदारसंघांतून ठेवण्यात आला होता. पाणी, उद्योग आणि रोजगार वाढ या त्रिसूत्रीवर काम करणार असल्याचे सावे यांनी पत्रकारांशी विमानतळावर बोलताना सांगितले.

May be an image of 7 people, people standing, car and outdoors

नवी पाणीपुरवठा योजना तत्परतेने पूर्ण करू, शेंद्र्यात दोन नवे उद्योग आणण्याची ग्वाही यापूर्वी फडणवीस मुख्यमंत्री असलेल्या मंत्रिमंडळात शेवटच्या टप्प्यात अतुल सावेंना राज्यमंत्रिपद मिळाले होते. तेव्हा त्यांनी १६८० कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा योजना ५५ दिवसांत मंजूर करून आणली होती. त्या योजनेच्या निविदाही विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रकाशित करण्यात आल्या होत्या. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या काळात योजना कासवगतीने चालली. सत्काराला उत्तर देताना या संदर्भात सावे म्हणाले की, मी आजच राज्याचे पाणीपुरवठा सचिव संजीव जयस्वाल यांना भेटून आलो आहे. पाणीपुरवठा योजनेला गती देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीमध्ये पिरामल आणि अजून एका मोठ्या ग्रुपसोबत बोलणे सुरू असून ते लवकरच आपले युनिट डीएमआयसीत टाकणार आहेत. त्यातून रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होईल.