वैजापूर नजीक धावत्या बसला आग ; मोटारसायकल स्वार तरुणांमुळे 30 प्रवाशी बचावले

औरंगाबाद-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घटना 

वैजापूर ,४ जुलै  /प्रतिनिधी :-धावत्या बसला अचानक आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला.परंतू मागून दुचाकीवरून येणाऱ्या दोन तरुणांनी बसचा पाठलाग करून चालकास सांगितल्यानंतर त्याने बस थांबविली व प्रसंगावधानामुळे बसमधील 30 प्रवासी बालंबाल बचावले. ही घटना 3 जून रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास औरंगाबाद- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील रोटेगाव उड्डानपुलावर घडली. 
वाशीम – नाशिक बस ( क्रमांक एम.एच. 40 वाय 5661) नाशिककडे जात असताना तालुक्यातील खंडाळ्यानजीक बसच्या पाठीमागून अचानक धूर निघायला लागला. काही वेळातच बसने पेट घेतला व आगीचे लोट बाहेर पडताना दिसू लागले. त्याचवेळी वैजापूर येथील माजिद शेख व सचिन साकला हे दोघेजण दुचाकीवरून खंडाळा येथून वैजापूरकडे येत होते. त्यांना हा प्रकार निदर्शनास आल्याने त्यांनी बसचा पाठलाग सुरू केला. बसचा वेग जास्त असल्यामुळे त्यांना पाठलाग करणे अवघड जात होते. बसने मागून पेट घेतला. परंतू चालकास त्याची भणकही लागली नाही. या दोघांनी कसाबसा पाठलाग करून शहरानजीकच्या रोटेगाव उड्डानपुलावर बस थांबवून चालकास ही माहिती दिली. त्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून प्रथम 30 प्रवाशांना खाली उतरून अग्निरोधक यंत्राच्या साह्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तोपर्यंत ही माहिती नागरिकांनी वैजापूर पोलिस ठाण्यासह अग्निशमन दलास कळविली. त्यानंतर काही वेळातच दोन्हीही यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. परंतू तोपर्यंत बसमधील आग विझविण्यात यश आले होते.

या घटनेत बसच्या टायरसह मागील भाग जळून नुकसान झाले. घटनेनंतर चालकाने प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसून दुर्घटनाग्रस्त बस वैजापूर आगारात लावण्यात आली. दरम्यान या दोन्हीही तरुणांच्या सतर्कतेमुळे बसमधील 30 प्रवाशांचे प्राण वाचले. एवढे मात्र नक्की. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच याच उड्डानपुलावर धावत्या बसने पेट घेतला होता. तेव्हाही बसमध्ये 35 ते 40  प्रवासी होते. बसच्या टायरखाली दुचाकी आल्याने  बसने पेट घेतला होता.