वैजापुरात स्मशानभूमीत गुढी उभारून हवामान व पीक पाण्याचे भाकीत ठरविण्याची जुनी परंपरा

वैजापूर ,२२ मार्च / प्रतिनिधी :- साडेतीन मुहुर्तापैकी एक समजला जाणारा गुढी पाडवा हा सण वैजापूर येथील स्मशानभुमीत गुढी उभारुन साजरा केला जातो. या गुढीवरुन पुढील वर्षाचे हवामान व पीक पाण्याचे भाकित ठरवण्याची जुनी परंपरा शहरात रुढ आहे. त्यामुळे या गुढीला अतिशय महत्व आहे.गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी स्मशानभुमीत मान्यवरांच्या उपस्थितीत ही गुढी उभारली जाते. गुढी पाहण्यासाठी नागरिक जमा होतात. त्यानुसार येथील स्मशानभुमीत मंगळवारी (ता.21) सायंकाळी ही गुढी उभारण्यात आली.बुधवारी सकाळी पुढील वर्षाचे भाकित समजणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.

शालिवाहन नगरी पैठण येथून ही गुढी चोरून वैजापूर येथे आणण्यात आली अशी आख्यायिका आहे. मात्र ही गुढी कोणी व कशासाठी आणली याबाबत अजूनही मतभिन्नता आहे. शालिवाहन शके काळापासून ही परंपरा असल्याचे बोलले जाते. दुष्काळ,पाऊस, पाणी, बाजाराची तेजी मंदी, धनधान्य या बाबतचे आराखडे या गुढीच्या माध्यमातून बांधले जातात. सुमारे ४५ वर्षापासून ही प्रथा शहरात सुरु आहे. पाडव्याच्या एक दिवस अगोदर अमावास्येला सायंकाळी पूजेला प्रारंभ होतो.स्मशान भूमीत ज्या ठिकाणी पार्थिवावर अंत्यसंस्कार होतात ती जागा स्वच्छ करून सडा संमार्जन केले जाते त्या जागेवर मडके ठेऊन त्यावर श्रीफळ असलेले लहान मडके विधिवत गुढीचे प्रतिक म्हणून ठेवले जाते त्यांच्या दक्षिण बाजूस 12 महिन्याचे 12 छोटे खड्डे खोदले जातात. याशिवाय पूर्व,पश्चिम,दक्षिण व उत्तर असे चार व राजाभाग व प्रजाभाग प्रत्येकी एक असे एकूण 18 खड्डे खोदले जातात या खाड्यांमध्ये ज्वारीची 21दाणे टाकून त्यावर रुईचे पाने टाकली जातात.

गुढी पाडव्याच्या दिवशी सूर्योदय होण्यापूर्वी गुढीला पंचधान्याचा नैवेद्य दाखवण्यात येतो त्यानंतर रुईचे पाने काढून खड्डे उघडले जातात . नैवेद्य दाखविल्यानंतर कावळा ज्या दिशेने नैवेद्य घेऊन जातो तिकडे दुष्काळाचे सावट राहील असे समजले जाते. प्रत्येक महिन्याचे खड्डे उघडून बघितले असता खड्डयामधील ज्वारीची दाने कमी झालेले असतात त्यामुळे त्या महीन्यात बाजारात मंदीची सावट राहील असा निष्कर्ष काढण्यात येतो. त्याचप्रमाणे कुठे दुष्काळ पडेल,कुठे पाऊस पडेल, धनधान्याची मुबलकता असेल किंवा नाही या विषयीचे आराखडे बांधले जातात. ही आख्यायिका ऐकण्यासाठी पाडव्याच्या दिवशी वेशीतील मारुती मंदिरात नागरिकांची मोठी गर्दी होते. 

——————————————————-

जरी हे ज्ञान विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे तरीसुद्धा गत 40 ते 45 वर्षापासून चालत आलेल्या या स्मशानभूमीतील गुढीचे भविष्य जाणण्यासाठी वैजापुरातील सर्व स्तरातील मंडळी 45 वर्षापासून येतात व जे भाकीत गुरुजी व्यक्त करतात ते तंतोतंत खरे ठरत आलेले आहे यामुळेच स्मशानभूमीतील गुढीचे मोठे महत्व आहे.

राजेंद्र साळुंके (तालुकाप्रमुख शिवसेना शिंदे गट)

——————————————————-