नारी शक्ती वंदन विधेयक राज्यसभेतही मंजूर

देशाच्या संसदीय प्रवासातील हा एक सुवर्ण क्षण आहे-पंतप्रधान नरेंद्र मोदी 

नवी दिल्ली,२१ सप्टेंबर /प्रतिनिधी :- बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित महिला आरक्षण विधेयक म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयक लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही मंजूर झालं आहे.या विधेयकाला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला. विधेयकाच्या समर्थनार्थ २१५ मते पडली आणि विरोधात एकही मत पडले नाही.  लोकसभा आणि देशातल्या सर्व राज्यांमधील विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षणाच्या विधेयकाला सोमवारी (१८ सप्टेंबर) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्यानंतर मंगळवारी नव्या संसदेत प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक लोकसभेच्या पटलावर ठेवलं. बुधवारी यावर लोकसभेत मतदान घेण्यात आलं. लोकसभेत ४५४ सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. तर केवळ दोन खासदारांनी या विधेयकाविरोधात मतदान केलं. त्यामुळे हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं.

लोकसभेपाठोपाठ आज (२१ सप्टेंबर) राज्यसभेत या विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. राज्यसभेत उपस्थित सर्वच्या सर्व खासदारांनी या विधेयकाच्या बाजूने मत दिलं. राज्यसभेत या विधेयकाच्या विरोधात एकही मत पडलं नाही. त्यामुळे हे विधेयक कनिष्ठ सभागृहापाठोपाठ आता वरिष्ठ सभागृहानेही मंजूर केलं आहे.

विधेयक मंजूर झाल्याबद्दल, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सर्वांचे अभिनंदन केले आणि असेही सांगितले की हा एक योगायोग आहे की हिंदू प्रथेनुसार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस आहे. मी त्याचे अभिनंदन करतो. 

हे विधेयक मंजूर झाल्यावर पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा आपल्या देशाच्या लोकशाही प्रवासातील निर्णायक क्षण आहे. १४० कोटी भारतीयांचे अभिनंदन. नारी शक्ती वंदन कायद्यासाठी मतदान करणाऱ्या सर्व राज्यसभा खासदारांचे मी आभार मानतो. असा एकमुखी पाठिंबा खरोखरच आनंददायी आहे. यासह, आम्ही भारतातील महिलांसाठी सशक्त प्रतिनिधित्व आणि सक्षमीकरणाचे युग सुरू करतो. त्यांचे आवाज आणखी प्रभावीपणे ऐकले जातील याची खात्री करण्यासाठी हे ऐतिहासिक पाऊल एक वचनबद्ध आहे.

हा एक सुवर्ण क्षण -पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान आणि सभागृहाचे नेते नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत, संविधान (एकशे अठ्ठाविसावी दुरुस्ती) विधेयक, २०२३ ला दिलेल्या समर्थनाबद्दल आणि त्यावरील अर्थपूर्ण चर्चेबद्दल आज सर्व राजकीय पक्षांचे आभार मानले आहेत. नवीन संसद भवनातील कामकाजाचा पहिला महत्त्वाचा विषय म्हणून पटलावर मांडण्यात आलेल्या या विधेयकावर काल लोकसभेत चर्चा झाली आणि त्याला मंजुरी मिळाली.

आज सदनाचे कामकाज सुरू होताच पंतप्रधानांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि कालच्या कामकाजाचा ‘भारताच्या संसदीय लोकशाहीच्या प्रवासाचा सुवर्ण क्षण’ म्हणून उल्लेख केला आणि त्यांनी या कामगिरीचे श्रेय सर्व पक्षांच्या सदस्यांना आणि त्यांच्या नेत्यांना दिले. ते म्हणाले की, कालचा निर्णय आणि राज्यसभेत होणाऱ्या परमोच्य अशा आगामी ऐतिहासिक निर्णयामुळे मातृशक्तीची मनस्थिती बदलेल आणि त्यातून निर्माण होणारा आत्मविश्वास देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी एक अकल्पनीय शक्ती म्हणून उदयास येईल. “हे पवित्र कार्य पूर्ण करण्यासाठी, मी, या सभागृहाचा नेता या नात्याने, तुमचे योगदान, समर्थन आणि अर्थपूर्ण चर्चेबद्दल माझ्या अंतःकरणापासून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उभा आहे”, असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.