नृत्यांगना गुरु पार्वती दत्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याने  प्रेक्षक मंत्रमुग्ध

शानदार नृत्याविष्काराने प्रादेशिक सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात;  गायन, ओडिसी नृत्य आणि लोकवाद्यांच्या सुरांना रसिकांची उत्स्फूर्त दाद

पुणे ,२२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-  कथ्थक कलाकार  नंदकिशोर कपोते, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता , दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक प्रोफेसर सुरेश शर्मा, ओडिसी नृत्यांगना पार्वती दत्ता, सुगंधा दाते, सीमा कालबेलिया लोककलाकार गाजी खान यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती सभागृह येथे आयोजित  प्रादेशिक संस्कृती महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

उद्घाटनानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील नृत्यांगना गुरु पार्वती दत्ता आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या नृत्याने  प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.  या नृत्याविष्काराला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. नृत्य पथकाने मंगलाचरणातील शिव स्तुतीच्या सादरीकरणाच्या माध्यमातून भगवान शंकराला वंदन केले. 

पार्वती दत्ता यांच्या एकल नृत्याला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दशावतार, रामायण, पल्लवी आणि मोक्षाचे अप्रतिम सादरीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळाले.

सारेगामा लिटिल चॅम्पस्  २०१९ च्या विजेत्या सुगंधा दाते यांनी मराठी अभंग आणि हिंदी चित्रपट गीते सादर केली.

प्रेक्षक लोकझंकारच्या तालावर नाचले

आठ राज्यातील लोककलाकारांच्या लोकझंकाराच्या सादरीकरणाने रसिकांना लोकसंगीताचा तालावर ठेका धरायला भाग पाडले.  झंकारमधील लोकगायन, वाद्य, नृत्याच्या सादरीकरणालाही रसिकांनी दाद दिली. लोककलाकारांनी सादर केलेले पारंपरिक कालबेलिया नृत्य वैशिष्ट्यपूर्ण ठरले.  या सर्पमित्र नृत्याच्या प्रत्येक अविष्काराने, तालाने आणि सुरांनी एक वेगळेच वातावरण निर्माण केले.  यासोबतच घुम-चक्कर या सादरीकरणानेही प्रेक्षकांची मने जिंकली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी आर्मी पब्लिक स्कूलच्या ५० विद्यार्थी यानी  गोंड, वारली आणि मण्डाणा च्या नामवंत कलाकारांकडून प्रशिक्षण घेऊन चित्राविष्कार सादर केला.

शनिवारी मधुरा दातार यांची  संगीत मैफल

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा येथील कला शाखेचे विद्यार्थी कथ्थक नृत्य सादर करतील.  तसेच प्रसिद्ध गायिका मधुरा दातार गीते सादर करणार आहेत. पुण्यातील रसिक प्रेक्षकांनी उपस्थित राहून कलाकारांच्या कलागुणांना दाद द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.