शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला

पुणे, १५ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज 15 नोव्हेंबर रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शासनाच्यावतीने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्वर्गीय पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, खासदार गिरीष बापट, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सहपोलिस आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सहायक संचालक सुनीता आसवले यांनीही स्वर्गीय पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. तसेच खासदार अरविंद सावंत, पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर सुनिता वाडेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदींनी स्वर्गीय पुरंदरे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.

May be a close-up of 1 person and beard

संपूर्ण शासकीय इतमामात स्व. पुरंदरे यांच्या पार्थिवावर विद्युत दाहिनीत अंतिम संस्कार करण्यात आले. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. पार्थिवावर तिरंगा लपेटल्यानंतर मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांचे सुपुत्र अमृत पुरंदरे आणि प्रसाद पुरंदरे यांच्या ताब्यात राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला.

स्वर्गीय पुरंदरे यांना श्रद्धांजली देण्यासाठी कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के आदी अधिकारी उपस्थित होते.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक केला व्यक्त

विनोदबुद्धीने परिपूर्ण, विद्वत्ता आणि भारतीय इतिहासाचे समृध्द भांडार असलेले व्यक्तिमत्व असलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी जोडल्याबद्दल पुरंदरे यांनी दिलेल्या योगदानाचे त्यांनी स्मरण केले. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या शतक महोत्सवी वर्ष कार्यक्रमात पुरंदरे यांनी केलेले भाषण देखील पंतप्रधानांनी सर्वांसाठी सामायिक केले.

नवीन पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय गाथेशी जोडून ठेवण्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेल्या योगदानाचे पंतप्रधानांनी आदरपूर्वक स्मरण केले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज सकाळी निधन झाले. पंतप्रधान मोदी यांनी आजच्या कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ इतिहासकार पुरंदरे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. “आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांनी देशासमोर मांडलेला, छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्तुंग आदर्श आपल्याला निरंतर प्रेरणा देत राहील. मी त्यांना अंतःकरणापासून श्रद्धांजली समर्पित करत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.


ट्विट संदेशांमध्ये पंतप्रधान म्हणाले:

“मला या बातमीने झालेले दुःख शब्दातीत आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृतीच्या जगात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. येणाऱ्या पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी जोडल्याबद्दल त्यांचे आपण सदैव ऋणी राहू. त्यांनी केलेले इतर कार्य देखील आपल्या सदैव स्मरणात राहील.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे विनोदबुद्धी, विद्वत्ता आणि भारतीय इतिहासाचे समृध्द भांडार असलेले व्यक्तिमत्व होते. गेल्या अनेक वर्षांच्या काळात त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याचा सन्मान मला मिळाला. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या शतक महोत्सवी वर्ष कार्यक्रमात त्यांनी श्रोत्यांशी संवाद साधला होता.

बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या व्यापक कार्यामुळे सदैव आपल्यात जिवंत राहतील. या दुःखद प्रसंगी मी त्यांचे कुटुंबीय आणि असंख्य चाहत्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”