शेतकऱ्यांना मिळणार ‘रासायनिक व सेंद्रीय खते’ – मंत्री संदिपान भुमरे

मुंबई,२२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी या वर्षी ‘रासायनिक व सेंद्रीय खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी दिली.

मंत्री श्री. भुमरे म्हणाले की, भाऊसाहेब फुंडकर फळबाग या योजनेंतर्गत लाभार्थींना ठिबक सिंचन संचाच्या उभारणीकरिताचे अनुदान केंद्र पुरस्कृत ‘राष्ट्रीय योजना प्रति थेंब अधिक पीक’ या योजनेतून देण्यात येत होते. तसेच शेतकऱ्यांना इतर योजनांमधून ठिबक सिंचन संचाचा लाभ होत असल्याने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून ठिबक ‘सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबीऐवजी आता ‘खते देणे’ ही बाब समाविष्ट करण्याची तसेच सुधारित केलेल्या मापदंडांना मंजूरी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शासन अनुदानीत बाबींच्या प्रती हेक्टरी सुधारित मापदंडांना मंजूरी देण्यात आली आहे.

यापुढे जिवंत झाडांचे प्रमाण निश्चित केल्यानुसार प्रमाणात दिसून आल्यास लाभार्थींना देय असणारे अनुदान तीन वर्षांत ५०:३०:२० या प्रमाणात न देता अंदाजपत्रकामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षामध्ये देय दर्शविण्यात आलेल्या अनुदानाप्रमाणे देण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. भुमरे यांनी दिली.