कन्नड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची जिल्हाधिकाऱ्यांनी  केली पाहणी

छत्रपती संभाजीनगर,२१ मार्च  / प्रतिनिधी :-  अवकाळी पावसामुळे कन्नड तालुक्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत त्या पंचनाम्यांचीही पाहणी करुन उर्वरित शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करण्याचे संबंधिताना निर्देश दिले.

तालुक्यातील पिशोर, पळशी, रामनगर, साखरवेल परिसरातील तुकाराम हुनमंत निर्मळ, सर्जेराव गिरजाबा नलावडे, श्रीमती कमलबाई कैलास गायकवाड, नारायन बंडु डहाके, आदि शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतींची आज जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी धीर दिला.

भारंबा तांडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची पाहणी

भारंबा तांडा येथील शाळेची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या देखील त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी गावकऱ्यांनी शाळकरी मुलांना येणाऱ्या दैनंदिन अडचणीची माहिती दिली. शाळेतील विद्यार्थी संख्या लक्षात घेता अतिरिक्त शिक्षक देण्याची मागणी तसेच इतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी करता जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ यासंबधी कार्यवाही करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिल्या. 

 बाजारसांवगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

बाजारसांवगी येथील आयुष्यमान भारत आरोग्य वर्धीनी केंद्रास भेट देऊन तेथील आरोग्य अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच केंद्रातील कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली. केंद्रातील कर्मचारी निवासस्थानांना भेट देत याठिकाणी करण्यात आलेल्या वृक्षरोपणाचे कौतुक करत आणखीन मोठया प्रमाणात वृक्षरोपण करण्याच्या सुचना देखील दिल्या. तद्नंतर पशुवैद्यकीय रुग्णालयाला भेट दिली. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख,तहसीलदार संजय वरकड, मुख्यधिकारी नंदकिशोर भोंबे  आदी अधिकाऱ्यांसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.