छत्रपती संभाजीनगर ‘मेट्रो’साठी पहिले पाऊल; अखंड उड्डाणपुलासह डीपीआर ६८०० कोटी रुपयांचा​-​ ​केंद्रीय अर्थ राज्यमंत्री​ ​​डॉ. भागवत कराड 

छत्रपती संभाजीनगर ,९ जून / प्रतिनिधी :- शहरासाठीच्या अखंड उड्डाणपुलाचा आणि मेट्रोचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) तयार झाला असून, त्याचे सादरीकरण लवकरच केले जाणार आहे. अखंड उड्डाणपुल आणि मेट्रो रेल्वे यांचा एकत्रित डीपीआर ६८०० कोटी रुपयांचा असल्याची माहिती ​ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री​ ​​डॉ. भागवत कराड यांनी  पत्रकारांना शुक्रवारी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले असून ,नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये राबविलेल्या विविध लोककल्याणकारी योजना आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी याविषयीचे सविस्तर प्रेझेंटेशन डॉक्टर कराड यांनी पत्रकारांसमोर मांडले.छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची संघटनात्मक बैठक झाली. 30 जून पर्यंत संवाद हे संपर्क अभियान राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे.छ.संभाजीनगर जिल्हा आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळे अकरा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. जनसंपर्क अभियान यशस्वीरित्या पूर्ण करण्यासंदर्भात आज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची देखील यांची आढावा बैठक घेण्यात आली.बैठकीसाठी सहकार आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे,भाजपा राज्य सरचिटणीस भारतीय जनता पार्टी संजय केनेकर, शिरीष बोराळकर शहर जिल्हा अध्यक्ष,विजय औताडे शहर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष, एकनाथ जाधव कार्य कारणी सदस्य, समिर राजूरकर,किरण पाटील यांच्यासह संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांचे पदाधिकारी आणि संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.

औरंगाबाद शहराचा काही वर्षांत होणारा विस्तार, वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे निर्माण होऊ शकणारी वाहतूक कोंडी याचा विचार करून वाळूज एमआयडीसी ते शेंद्रा एमआयडीसी पर्यंत एकच अखंड उड्डाणपुल असावा यासाठी वर्ष-दीड वर्षांपासून चर्चा सुरू आहे. हा एकच पूल तयार केला, तर दोन्हीही औद्योगिक वसाहती जोडल्या जातील आणि वाळूजच्या पुढे नगर-पुणे या शहरांकडे जाण्याचा; त्याचप्रमाणे शेंद्रा औद्योगिक वसाहतीपासून जालना व अन्य शहरांना जाण्याचा मार्ग मोकळा होईल. वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल आणि औद्योगिकीकरणाला चालना मिळेल, या उद्देशाने पुलाचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखंड उड्डाणपुलाबरोबरच मेट्रो रेल्वेही असावी, या दृष्टीने देखील विचार झाला आणि त्याचा प्रस्ताव तयार करण्याची तयारी सुरू झाली.

डॉ. कराडांचा पाठपुरावा

अखंड उड्डाणपुल आणि मेट्रो रेल्वेच्या प्रकल्पासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला. त्यांना स्थानिक नेत्यांच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन दोन्हीही प्रकल्पांची आवश्यकता लक्षात आणून दिली. गडकरी यांनी या दोन्हीही प्रकल्पांना तत्त्वत: मान्यता दिल्यानंतर दोन्हीही प्रकल्पांचे डीपीआर लवकर तयार व्हावेत, यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पाठपुरावा केला. यासाठी ‘महामेट्रो’च्या प्रतिनिधींबरोबर बैठका घेतल्या.या दोन्हीही प्रकल्पांसाठी लागणारा खर्च राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जावा यासाठी येत्या काळात प्रयत्न केले जाणार आहेत.तयार करण्यात आलेल्या डीपीआरचे काही दिवसांत सादरीकरण केले जाणार आहे, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वेळ मागितली असल्याची  माहितीही डॉ. कराड यांनी दिली. 

सहकार मंत्री अतुल सावे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वपूर्ण असलेल्या योजना घराघरापर्यंत कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गेल्या पाहिजेत. कार्यकर्त्यांनी या अभियानात स्वतःचा सक्रिय सहभाग वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे. तसेच नऊ वर्षांमध्ये राबवलेल्या विविध योजना आणि त्यांचे लाभार्थी यांच्याशी संपर्क देखील केला पाहिजेत. असे सहकार ,बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले आहे.

केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी म्हटले की, जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात सरकार विषयी उत्सुकता आहेत. जनसंपर्क अभियानामध्ये प्रमुख अकरा कार्यक्रम देण्यात आलेले आहे.आणि त्यासाठी स्थानिक पातळीवर प्रमुख पदाधिकारीयांची निवड केलेली आहे. प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी अभियानातील कार्यक्रम चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सक्रियपणे सहभाग घेणे आवश्यक आहे.

अर्थ राज्यमंत्री 

डॉक्टर कराड यांनी कन्नड आणि संभाजीनगर पूर्व, त्यानंतर बजाज नगर या ठिकाणी झालेले मेळावे ,जनसंपर्क अभियान ,प्रत्यक्ष संवाद यामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेचा उत्साह दिसून आला. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील जास्तीत जास्त नागरिकांशी संवाद प्रक्रिया राबवावी असेही, डॉक्टर कराड यांनी यावेळी म्हटले आहे.