छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ अर्जांची संख्या ४ लाख ३ हजार १५ तर विराेधात २ लाख ७३ हजार २१० हरकती 

छत्रपती संभाजीनगर,२७ मार्च  / प्रतिनिधी :-  औरंगाबाद​चे ​ नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आले​ले ​ आहे. या बदलेल्या नावांच्या संदर्भात प्रशासनाकडे हरकती घेण्यात आल्या. समर्थनामध्ये आणि विरोधामध्ये किती लोक आहेत, याची अंदाजे आकडेवारी विभागीय आयुक्त कार्यालयाने जाहीर केली. 

​छत्रपती संभाजीनगरच्या नामांतरास आक्षेप घेण्याचा सोमवार शेवटचा दिवस होता. शहराच्या नामांतराच्या समर्थनार्थ साेमवारी दिवसभरात भाजप तसेच सकल हिंदू समाज एकत्रीकरण समितीतर्फे ३ लाख ९१ हजार ८३९ सूचना देण्यात आले.

आज छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनार्थ २ लाख ८ हजार निवेदन पत्र वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढून विभागीय आयुक्तांकडे सुपुर्द केले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नामांतराच्या विरोधात एमआयएम तसेच विविध संघटनांच्या वतीने १ लाख २० हजार ९०७ हरकती नाेंदवण्यात आल्या आहेत. आता छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ एकूण अर्जांची संख्या ४ लाख ३ हजार १५ तर विराेधात २ लाख ७३ हजार २१० हरकती आल्या आहेत. दुसरीकडे, धाराशिव नामांतराच्या समर्थनार्थ ११७ तर विराेधात २८ हजार ६१४ अर्ज आयुक्तालयात आले आहेत.​

सोमवारी जमा केलेल्या अर्जांची मोजणी केली जाईल. त्यानंतर संगणकावर नोंदणी होईल. हे काम १५ दिवस चालेल. त्यानंतर शासनाच्या सूचनेनुसार कागदपत्रे मंत्रालयात पाठवली जाणार आहेत, अशी माहिती महसूल उपायुक्त पराग साेमण यांनी दिली आहे.