शरद पवारांपाठोपाठ संजय राऊतांनाही जीवे मारण्याची धमकी

शरद पवार यांना धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल, तर राऊतांना धमकी देणारे दोन जण पोलिसांच्या ताब्यात

धमकी देणं खपवून घेणार नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई, ९ जून / प्रतिनिधी :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून दंगली घडत असल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. औरंगजेबाचे स्टेटस लावल्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी वाद झाले. यावर कारवाई होऊनही त्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत. हे वाद आता राजकीय वर्तुळात जाऊन पोहोचले आहेत. राज्यातील नेत्यांना आता धमकी देण्याचं सत्र सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

‘तुझा लवकरच दाभोळकर होणार आहे’; शरद पवारांना धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना एका ट्विटर हॅंडलवरुन जीवे मारण्याची धमकी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. यात ‘तुझा लवकरच दाभोळकर होणार आहे’ अशा स्वरुपाची धमकी देत घाणेरड्या भाषेत शिवीगाळही करण्यात आली. यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार व शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली. तसेच महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, अत्यंत घाणेरडं आणि खालच्या पातळीवरचं राजकारण सुरु आहे, यात गृहविभागाने तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

संजय आणि सुनील राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही वारंवार जीवे मारण्याची धमकी येत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. कालपासून ते छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. तेव्हापासून सातत्यानं त्यांना धमक्यांचे फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी फोन बंद करुन ठेवला असता त्यांचे बंधू व भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांना त्याच व्यक्तीककडून धमकी आल्याचे संजय राऊत म्हणाले. यावेळी सरकारलाच आमचं बरंवाईट व्हावं असं वाटतं आणि त्यामुळे हे सर्व ते घडवत आहेत, असा आरोप संजय राऊतांनी केला.

राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत : देवेंद्र फडणवीस

दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला यासंबंधी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, “धमकी देणं खपवून घेणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एक उच्च परंपरा आहे. राजकीय पातळीवर मतभेद असले तरी मनभेद नाहीत. कोणत्याही नेत्याला धमकी देणं किंवा समाजमाध्यमांवर व्यक्त होताना सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणं खपवून घेतलं जाणार नाही. अशा प्रकरणात कायद्याप्रमाणे पोलीस निश्चित कारवाई करतील”‘ अशा कठोर शब्दांत फडणवीसांनी इशारा दिलेला आहे.

धमक्या देऊन कोणाचा आवाज बंद कराल असे  वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना “तुझा लवकरच दाभोळकर होणार” अशी धमकी ट्विटरवरुन देण्यात आली होती. यानंर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. या प्रकरणावर शरद पवार यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर मला विश्वास आहे. त्यामुळे मला याची चिंता नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.image.png

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, प्रत्येक नागरिकाला कोणत्याही प्रश्नावर मत देण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे धमक्या देऊन कोणाचा आवाज बंद कराल असं वाटत असेल तर हा गैरसमज आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेवर मला पुर्ण विश्वास आहे, त्यामुळे मला याची चिंता नाही. पण राज्यातील सुत्रे ज्यांच्या हातात आहेत. त्यांना जबाबदारी टाळता येत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
image.png

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ट्विटरवरुन आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी याबाबत मी स्वत: बोललो आहे. तसंच त्यांना तपासाच्या सुचना दिल्या आहेत. असं शिंद म्हणाले आहेत. याच बरोबर शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल. तसंच आवश्यकता असल्यास त्यांच्या सुरक्षेत देखील वाढ केली जाईल. असं ट्विट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

कारवाई करण्याचे फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना आदेश

‘राजकारण महाराष्ट्राचं’ असं या ट्विटर हँडलचं नाव आहे. याप्रकरणी सौरभर पिंपळपर याचं देखील नाव समोर आलं आहे. सौरभ पिंपळकर हा भाजपचा कार्यकर्ता असल्याची त्याच्या फेसबूकवर माहिती आहे. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यामागचा मास्टर माईंड कोण आहे? याचा तपास करुन त्यावर कारवाई करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबत मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी फोनवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण ते बाहेर असल्यानं त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सौरभ पिंपळगावकरचे कॉल रेकॉर्ड तपासून त्याला कोणाचा पाठिंबा आहे? याचाही तपास करावा, असं अजित पवार म्हणाले आहेत. सध्या सोशल मीडियावर पवारांच्या नावाने एक मेसेज फिरत आहे. “मी छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार” असं शरद पवार म्हणाले, अशी चुकीची बातमी एका माध्यमाने दिली होती. यानंतर तात्काळ त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर दिलगिरी देखील व्यक्त केली होती. यावेळी बातम्या देताना खातरजमा करत चला, असा सल्ला त्यांनी माध्यमांना दिला.

पवारांना आलेल्या धमकीनंतर त्यांना ज्या ट्विटर हँडलवरुन धमकी आली. त्या ट्विटर हँडलची शहानिशा करुन त्यावर कारवाई करा, असा आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिला आहे. फणसाळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन पाऊण तासाची भेट घेतली. या भेटीत त्यांनी शरद पवार यांना आलेल्या धमकीविषयी माहिती दिली.

शरद पवार यांना धमकी देणाऱ्यांवर गुन्हा दाखल

या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी तात्काळ पावले उचलली आहेत. संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले असून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या तक्रारीवरुन नर्मदा पटवर्धन आणि सौरभ पिंपाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भादंवि कलम 153 A, 504, 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखा या प्रकरणी पुढली तपास करत आहे. तर संजय राऊत आणि सुनील राऊत यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राऊत बंधुंकडून याप्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्यानं या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. या प्रकरणी पोलिसांकडून गुन्हा दाखल करुन अटकेची कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही जण हे गोवंडीतील राहणारे असून त्यांनी नशेत असताना ही धमकी दिल्याची माहिती आहे.

पवारांना धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना धमकी देणारा 26 वर्षीय सौरभ पिंपाळकर हा भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या ट्विटरवर ‘आय ॲम बीजेपी ॲक्टिव्हिस्‍ट, आय हेट सेक्‍यूलेरिझम’ असं लिहून ठेवलं आहे. तसंच त्याचे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत फोटो असल्याचं समोर आलं आहे. सौरभ हा अमरावतीमधील साईनगर भागात राहतो. अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या असून गाडगेनगर पोलिसांचं एक पथक त्याचा शोध घेत आहे. सौरभच्या घरी देखील हे पथक जाऊन आले आहे. पण सौरभ त्या ठिकाणी आढळून आलेला नाही, त्याचा मोबाईल फोन देखील बंद आहे.