राज्यातील प्रत्येक विद्यापीठामध्ये युवा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा विचार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

ठाणे,१२ एप्रिल /प्रतिनिधी :-   युवा साहित्य संमेलनासारख्या उपक्रमामुळे तरुण पिढी सक्षम होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात अशी युवा साहित्य संमेलने व्हायला हवीत. राज्यातील विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील तरुणांच्या साहित्य कलांना वाव देण्यासाठी प्रत्येक विद्यापीठांमध्ये देखील युवा साहित्य संमेलने व्हावीत, यासाठी कुलपती तथा राज्यपाल यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.

कोकण मराठी साहित्य परिषद व ठाणे महानगरपालिका यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज ठाण्यातील काशिनाथ घाणेकर सभागृहात झाले. त्यावेळी श्री. सामंत बोलत होते. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष युवा साहित्यिक प्रणव सखदेव, ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक, माजी कुलगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी महापौर नरेश म्हस्के, कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता किर, विश्वस्त रमेश किर, कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ, ठाणे शाखा अध्यक्ष संगीता कुलकर्णी, युवा शक्ती अध्यक्षा दीपा ठाणेकर, जयू भाटकर, विलास जोशी, सुनील चौधरी, जवाहरलाल पुरोहित आदी यावेळी उपस्थित होते. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची सुरुवात सकाळी ग्रंथ दिंडीने झाली. विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून संमेलनाचे उद्घाटन झाले.

कोणतीही निवडणूक न होता संमेलनाध्यक्षांची निवड करण्याचा चांगला पायंडा युवा साहित्य संमेलनाने पाडला आहे. अशा प्रकारचे संमेलन ग्रामीण भागात व्हावे, यासाठी पुढील संमेलन रत्नागिरीत घेण्याचे निमंत्रण मी आताच देत आहे, असे सांगून श्री. सामंत म्हणाले की, सध्या सुरू असलेली ग्रंथालये का बंद पडत आहेत, मुलांपर्यंत साहित्य कसे पोचेल आणि वाचन संस्कृती कमी का होत आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अशी संमेलने आयोजित करायला हवीत. साहित्याला राजाश्रय मिळायला हवा. मात्र, राजकिय अभिनिवेष त्यामध्ये येता कामा नये. ठाण्यामध्ये साहित्यला चांगला राजाश्रय मिळत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

कथा, कविता कशी लिहाव्यात, नवीन साहित्याची निर्मिती कशी करावी, यासाठी युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी तरुणांना मार्गदर्शन करावे. महाराष्ट्रातील साहित्यिकांची परंपरा पुढे चालविणारा तरुण साहित्यिक निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलली आहे. अशा संमेलनातून विद्यार्थ्यांची ती मानसिकता बदलण्यास मदत होते. कोकण साहित्य परिषदेची चांगली पुस्तके तरुणांपर्यंत जाण्यासाठी ही पुस्तके राज्यातील सर्व ग्रंथालयामार्फत पोहोचविण्यात येतील, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.

संमेलनाध्यक्ष श्री. सखदेव म्हणाले की, आजकालची मुले वाचत नाहीत, हे खरे आहे का ते तपासले पाहिजे. कारण इन्स्टाग्राम, फेसबुक सारख्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण लिहित असतात. मुंबई, पुणे या परिघाबाहेरही खूप मोठा महाराष्ट्र आहे. पुढील काळात साहित्य, संस्कृती टिकविणारी पिढी ही या परिघाबाहेरची आहे. या परिघाबाहेरील तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाचनाची ऊर्जा आहे, ती जाणून घेता यायला हवी. आजही अनेक तालुक्यात पुस्तकांची दुकाने नाहीत. अशा ठिकाणी पुस्तकांची दुकाने सुरू करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, समाजात संवेदनशीलता कमी होत आहे. युवा साहित्य संमेलनातून ही संवेदनशीलता वाढण्यास व पुढील पिढीपर्यंत पोचविण्यास मदत होईल. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात पुस्तकांचा सहवास कमी होत आहे. सर्व गोष्टी शॉर्टकटपद्धतीने मिळत आहेत. मात्र, अशा संमेलनामुळे तरुणांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यास व त्यांच्यातील ऊर्जा योग्य ठिकाणी वापरण्याचा मार्ग मिळेल. कोकण मराठी साहित्य परिषदेची गेली पंचवीस वर्षापासूनची चळवळ अशीच पुढील पिढ्यांपर्यंत सुरू राहिल.

डॉ. मुणगेकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन मंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते झाले.