ओबीसी आरक्षणासह निवडणूक व्हावी – मुख्यमंत्री

शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली ‘वारी’ने राज्यात चर्चांना उधाण

मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यात राजकीय भूकंप

नवी दिल्ली,९ जुलै /प्रतिनिधी :- राज्याच्या १७ जिल्ह्यांमधील ९२ नगरपालिकांची निवडणूक जाहीर झाली आहे. परंतु, ही निवडणूक ओबीसी आरक्षणासह व्हावी अशी आमच्या सरकारची इच्छा आहे. पावसाळ्यात निवडणूक घेणे अडचणीचे असून या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा केली जाईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. ओबीसी आरक्षणाबाबत तुषार मेहता यांची दिल्लीमध्ये भेट घेतली. ओबीसी आरक्षणाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील दिग्गज नेत्यांनी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. सत्ताधारी आणि विरोधक या सर्वच नेत्यांनी ही निवडणूक ओबीसी आरक्षणासहच व्हावी, अशी भूमिका स्पष्ट केली.

‘वारी’ने राज्यात चर्चांना उधाण

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी अमित शाह आणि शनिवारी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह दिग्गज नेतेमंडळींची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी मान्यवरांनी महाराष्ट्र आणि विविध विषयांवर चर्चा केली. शिंदे-फडणवीस यांच्या दिल्ली ‘वारी’ने राज्यात मात्र चर्चांना उधाण आले आहे.

तर एकनाथ शिंदे म्हणाले, दिल्ली दौऱ्यादरम्यान महामहिम राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांची सदिच्छा भेट घेतली. आषाढी एकादशीच्या एक दिवस आधी झालेल्या या भेटीत त्यांना सावळा विठुराया आणि रखुमाईची प्रतिमा भेट म्हणून दिली.

केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांची सदिच्छा भेट घेतली. राज्यातील संरक्षण विषयक महत्वाच्या विषयांबाबत लागेल ते सर्व सहकार्य करण्याची तयारी त्यांनी याप्रसंगी दर्शवली.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे. पी. नड्डा यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्याच्या वतीने त्यांना विठोबा रखुमाईची मूर्ती भेट म्हणून दिली. राज्यातील शिवसेना-भाजप युती सरकारची वाटचाल नीट व्हावी यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यासमयी बोलताना दिले. यासमयी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित होते.

शिवसेनेचे १५ खासदारही बंड करणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेच्या आमदारांनंतर १५ खासदारही बंडाच्या तयारीत आहेत. शिवसेना खासदारांची गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना नेते कृपाल तुमाणे यांच्या घरी काल (शुक्रवार) झालेल्या विशेष भोजनामध्ये शिवसेनेचे १० खासदार उपस्थित होते. यावेळी एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यावर चर्चा झाली. यावेळी भाजपाचा एक ज्येष्ठ नेताही उपस्थित होता, अशी माहिती आहे.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, भावना गवळी यांच्यासह आणखी ८ खासदार या भोजनाला उपस्थित होते, अशी माहिती आहे. एकूण १५ खासदार शिवसेनेतून फुटून शिंदे गटामध्ये सहभागी होऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. या खासदारांशी चर्चा करण्याची जबाबदारी श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी रात्री दिल्लीत दाखल झाले. शुक्रवारी रात्री दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. रात्री नऊच्या सुमारास सुरु झालेली बैठक मध्यरात्री दोनपर्यंत सुरु होती. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात झालेल्या शिवसेनेच्या बंडाचे पडसाद दिल्लीतही उमटणार हे आता स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी पत्र लिहून राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. त्यावर खासदारांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.