महालगावजवळ नामफलकाला धडकून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

वैजापूर ,​१०​ जून/ प्रतिनिधी :- रस्त्याच्या बाजूला असलेल्या नामफलकाला धडकल्याने दुचाकीस्वारचा जागीच मृत्यु झाला. ही घटना शनिवारी(ता.10) दुपारी वैजापूर –  गंगापूर रस्त्यावर महालगावजवळ घडली.‌ दिलीप नामदेव कुऱ्हाडे (वय ४५) असे मृताचे नाव असून तो वाशीम जिल्ह्यातील रोहणा (ता.मानोरा) येथील रहिवासी होता.‌ 

घटनेनंतर जवळपास दीड तास १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी तातडीने वीरगाव पोलिसांना कळवून खासगी रुग्णवाहिकेच्या मदतीने अपघातग्रस्त व्यक्तीस तातडीने वैजापुरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. विरगाव पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल गुणवंत थोरात यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. दिलीप कुऱ्हाडे हा दुचाकीवर (एमएच ३७ पी ४६७०) गंगापूरहून वैजापुरच्या दिशेने जात होता. महालगावपासुन पुढे गलांडे वस्तीजवळ आल्यानंतर दुचाकीने रस्त्याच्या बाजुला असलेल्या नामफलकाला जोराची धडक दिली. कुऱ्हाडे याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे धडक झाल्यानंतर जबर जखमी होऊन तो जागीच गतप्राण झाला. कुऱ्हाडे हा दारुच्या नशेत गाडी चालवत होता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्याच्याजवळ सापडलेल्या आधारकार्ड वरुन त्याची ओळख पटली.