वैजापूर तालुका कृती समितीच्या प्रयत्नांना यश ; संपूर्ण सेवाहमी कायद्याची अंमलबजावणी करणार – उपविभागीय अधिकारी माणिक आहेर

वैजापूर,​१ सप्टेंबर​  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयात संपूर्ण सेवाहमी कायद्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी वैजापूर तालुका कृती समिती ने मागील वर्षभरापासून निवेदने व पत्र देऊन आंदोलने केली होती. याला आता थोडे यश येताना दिसत आहे. उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांच्या दालनात तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. त्यात कृती समितीने मांडलेल्या सर्वच मुद्द्यांवर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन येत्या पंधरा दिवसात संपूर्ण सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल असे सांगितले.

तालुक्यातील नागरिकांच्या समस्या योग्य व्यासपीठावर निकाली काढण्यासाठी दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे तहसील स्तरावर आयोजन याच महिन्यापासून करण्यात येणार आहे असे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी स्पष्ट केले. विविध विभागांचे अधिकारी आणि कृती समितीचे दामोदर पारिक, विपीन साळे , नारायण कवडे, ज्ञानेश्वर आदमाने, सुरज शिंदे, रामचंद्र पिल्दे आदी यावेळी उपस्थित होते..