वैजापूर नगरपालिकेतर्फे ‘मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर’ अभियानांतर्गत आर.आर.आर. सेंटरचा शुभारंभ

वैजापूर ,​२२​ मे  / प्रतिनिधी :- भारत सरकारच्या “मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर”या अभिनव अभियानअंतर्गत आर.आर.आर. सेंटर (रेड्यूस, रियुज,रिसायकल) या केंद्राचे उदघाटन माजी शिक्षणाधिकारी तथा पालिका स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांच्याहस्ते सोमवारी (ता.22) झाले. 

पालिकेच्या स्वच्छता निरीक्षक कार्यालयात हे केंद्र उभारण्यात आले आहे. याप्रसंगी नोडल अधिकारी एम.एच.मोदाणी, स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालिकेचे प्रशासक मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या केंद्रात जुन्या वस्तू, जुनी भांडी, जुनी पुस्तके, जुने कपडे, जुने चप्पल बूट, इलेक्ट्रॉनिक वस्तू, इत्यादी वापरण्या योग्य वस्तू शहरातील नागरिकांनी आणून द्याव्यात असे आवाहन धोंडीरामसिंह राजपूत यांनी यावेळी बोलताना केले.

ज्या गोरगरीब व गरजूना यातील लागतील त्या वस्तू त्यांनी घेऊन जाव्यात यामुळे गरजूंची गरज पूर्ण होईल असेही राजपूत उदघाटन प्रसंगी म्हणाले. या केंद्रातील एका कोपऱ्याला “माणुसकीचे घर ” असे नाव देण्यात आले आहे तर दुसरा कोपरा रेड्यूस, रियुज, रिसायकल वस्तूचा आहे. यात ही चांगल्या प्लास्टिक व इतर वस्तू  जमा करण्यात येणार आहे. लाईफ स्टाईल फॉर एनव्हरमेंट असे या ठिकाणी लिहिलेले आहे. या उपक्रमात लोकांचा सहभाग महत्वाचा आहे “माझे शहंर – स्वच्छ, सुंदर व निरोगी शहर” असे घोषवाक्य या ठिकाणी लिहलेले आहे. केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी सहायक रमेश त्रिभुवन, कैलास त्रिभुवन, प्रथमेश त्रिभुवन,अजय त्रिभुवन व नागरिक उपस्थित होते.