वैजापूर बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची आज निवड ; सभापतीपदी काकासाहेब पाटील यांची तर उपसभापतीपदी कल्याण जगताप यांची वर्णी लागण्याची शक्यता

वैजापूर ,२१ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड करण्यासाठी सोमवारी (ता.22) सकाळी 11 वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. बाजार समितीच्या निवडणुकीत आ. रमेश बोरणारे व भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास पॅनेलला बहुमत मिळाले असल्याने या पॅनेलचे काकासाहेब पाटील  व कल्याण पाटील जगताप या दोघांपैकी एकाची सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर उपसभापती पदासाठी कल्याण दांगोडे यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीनेही सभापती व उपसभापतीपदासाठी आपले उमेदवार उभे करण्याचे ठरविले असल्याने या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 28 एप्रिल रोजी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत शिंदे गटाचे विद्यमान आमदार रमेश पाटील बोरनारे, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी व आप्पासाहेब पाटील यांच्या अधिपत्याखालील बळीराजा विकास पॅनलने अठरापैकी अकरा जागांवर विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले होते. तर महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला सात जागा मिळाल्या असून या पॅनलकडून संजय निकम, अविनाश गलांडे, प्रशांत सदाफळ, ज्ञानेश्वर जगताप ही मातब्बर मंडळी निवडून आलेली आहे. मात्र, बहुमत असल्याने सभापती व उपसभापती या दोन्ही जागांवर आ. बोरणारे यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास पॅनलचा दावा असणार आहे. सभापती व उपसभापती पदांची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही पदांसाठी अनेक नावे चर्चेत असून सभापतीपदी कल्याण जगताप व काकासाहेब पाटील या दोघांपैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बळीराजा विकास पॅनलकडुन रामहरी जाधव, कल्याण जगताप, गणेश इंगळे, काकासाहेब पाटील, कल्याण दांगोडे, शिवकन्या पवार, बाबासाहेब गायकवाड आदी उमेदवार विजयी ठरले होते.