माँ तुझे सलाम:एकल महिलांची कहाणी

हॅप्पी मोमेंटस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मातृदिनानिमित्त एकल महिलांचा सत्कार

छत्रपती संभाजीनगर ,२२ मे  / प्रतिनिधी :-मुली लहान असतानाच पती सोडून गेला. एमीएमच्या गेट नं. १० समोर कपडे विकूव मुलींना शिक्षण दिले. आज त्यातील एका मुलीची दामिनी पथकात निवड झाली. आणि माझे स्वप्न पूर्ण झाले अशा श्ब्दात संगीता पठाडे या एकल  महिलेने  त्यांचा प्रवास  उलगडून सांगितला. 

हॅप्पी मोमेंटस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मातृदिनानिमित्त २१ मे रोजी सिद्धार्थ उद्यानात कार्यक्रम झाला. या संस्थेच्या  अध्यक्षा बेरील सांचीस यांनी संसाराचा गाडा एकटेच हाकताना आयुष्यात आलेल्या मोठ-मोठे संकटाचा सामना करणाऱ्या एकल महिलांचा छोटासा किस्सा पाहुण्यांसमोर सादर केला. ६ महिलांची यासाठी निवड करण्यात आली होती. या ५ महिलांची कहानी ऐकताना उद्यानात आलेल्या इतर महिलांच्या अंगावर शहारे येत होते. भावनिक वातावरणात हा आगळा-वेगळा कार्यक्रम झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालकल्याण समिती अध्यक्षा आशा शेरखाने, मनपा उपायुक्त नंदा गायकवाड, माजी अध्यक्ष अॅड. ज्योती पत्की आदींची उपस्थिती होती. 

हमीदा बेगम यांच्या पतीचा खून झाला होता. तेव्हा दोन मुले आणि दोन्ही मुली खूप लहान होत्या. तरीही मोठ्या मेहनतीने त्यांनी चारही मुलांना शिक्षण देत लग्न लावले. आफरीन बेगम कमी वयातच विधवा झाली. अल्पशिक्षण असूनही तिने घरबसल्या कपडे विकण्याचा व्यवसाय  केला,दोन मुली व एक मुलगा शिक्षण घेत आहे. त्यांच्या सासूबाईंनी त्यांना वेळोवेळी मदत केली त्यांचाही या वेळी सन्मान करण्यात आला.

अदिति शार्दूल, प्रेमलता कराड,शैला पंडित यांचा  या वेळी सन्मान करण्यात आला. 

विधवा, परितक्त्या महिलांना मुलांच्या शिक्षणसाठी बाल कल्यण समितीच्या योजना अॅड. शेरखाने यांनी सांगितल्या. तर नंदा गायकवाड यांनी महिलांना मनपाच्या वतीने व्यवसाय सुरू करण्यासाठी असलेले योजनांची माहिती दिली. कार्यक्रमासाठी सीताराम अग्रवाल, शैलेश माने, गौरव जैन, पुष्पा लडा, रेजीना रॉड्रीक्स, अमोल क्षिरसागर यांनी सहकार्य केले.