वैजापूर तालुक्यात 16 कोटींचा पीकविमा मंजूर, बहुतांश शेतकरी पीकविम्यापासून वंचित

वैजापूर ,२८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- यंदा सप्टेंबर व ऑक्टोंवर महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे तालुक्यातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शेतकऱ्यांच्या पूर्व सूचनांचा सर्वे होऊन विमा कंपनीने 72 हजार 305 शेतकऱ्यांना भरपाईपोटी 16 कोटी 2 लाख 82 हजार 375 रुपये विमा मंजूर केला आहे.दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होईल असे सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत 2020-21 यावर्षी तालुक्यातील 2 लाख 28 हजार 871 शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीकविमा भरला होता.कापूस,कांदा, मका, मूग, तूर,सोयाबीन या पिकांचा विमा भरला असतांना फक्त कांदा व कापूस पिकाला विमा मंजूर झाला.53 हजार 738 शेतकऱ्यांनी कापसाचा तर 3 हजार 368 शेतकऱ्यांनी कांदा पिकाचा विमा भरला होता.विमा कंपनीच्या जाचक अटी व शर्तीमुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिले आहे.

गेल्या वर्षी विमा कंपनीकडे  तक्रार करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही.तालुक्यातील तब्बल 2 हजार 46 शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पूर्वसूचना दाखल केल्या होत्या त्याचे सर्वे महिन्याभरापासून सुरू होते.या सर्वेचे काम झाल्यानंतर कंपनी स्तरावर नुकसानीबाबत कार्यवाही सुरू होती.राज्य शासनाचा हिस्सा मिळाल्यानंतर मंगळवारी केंद्र शासनानेही विमा कंपनीकडे आपला हिस्सा जमा केला यामुळे विमा कंपनीने  वैजापूर तालुक्यातील 72 हजार 305 शेतकऱ्यांना 16 कोटी 2 लाख 82 हजार 375 रुपये पीक विमा मंजूर केला आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले असून, सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा मंजूर करण्यात यावा अशी मागणी होत आहे.