जेष्ठ बाल साहित्यिक धोंडिरामसिंह राजपूत यांच्या दोन लेख संग्रहाचे प्रकाशन

वैजापूर ,१९ जून/ प्रतिनिधी :-  मराठवाड्यातील जेष्ठ बालसाहित्यिक व स्तंभलेखक धोंडीरामसिंह राजपूत यांच्या राष्ट्र उभारणीत आजच्या युवकांचे स्थान “तरुणाई” हा 26 लेखांचा संग्रह व “प्रबोधन” हा 53 लेखांचा संग्रह असे दोन लेख संग्रह  असलेले पुस्तक महाजन प्रकाशन पुणे यांनी जागतिक पितृदिना चे औचित्य साधत रविवारी (ता.18) मराठा सेवा संघाच्या कार्यालयात “जिजाऊ सदन” येथे प्रकाशित केले. 

उदगीर महाविद्यालयाचे प्राचार्य व मराठवाड्याचे प्रसिद्ध समीक्षक व विचारवंत डॉ.राजकुमार म्हस्के व मराठवाड्याचे जेष्ठ कवी डी.बी.जगत्पुरिया यांच्या हस्ते प्रकाशन समारंभ संपन्न झाला. धोंडीरामसिंह राजपूत यांचे हे दोन्ही लेख संग्रह समाजाला व आजच्या तरुणाईला दिशा देणारे व मार्गदर्शक आहेत. यात सामाजिक समस्या व त्यावर मार्ग असे प्रबोधन करण्यात आलेले आहे. हे लेख आजच्या तरुणाईने निश्चितपणे वाचून त्यांचे अवलोकन करावे व सक्षम राष्ट्र उभारणीला हातभार लावावा असे प्रतिपादन  दोन्ही साहित्यिकानी यावेळी बोलतांना केले. 

या प्रसंगी साहित्यिक उत्तम बावस्कर, डॉ,शिवाजी हुसे, डॉ.विनोद सिनकर, डॉ.बलराज पांडव, अनंत कदम, डॉ.वसंत दाभाडे, के.जे.त्रिभुवन, डॉ. एकनाथ पांडव, पत्रकार रमेश दाणे व साहित्यिक उपस्थित होते, सूत्र संचलन कवी जगदीश देवपूरकर(धुळे)यांनी केले. आभार के.जे. त्रिभुवन यांनी मानले.