नगर-औरंगाबाद गोलवाडी उड्डाणपूलाचा दुसरा मार्गही खुला

औरंगाबाद,२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  

नगर-औरंगाबाद गोलवाडी उड्डाणपूलाचा दुसरा मार्ग आज मंगळवार दि.२१ पासून सुरु करण्‍यात आल्याची माहिती व त्‍याचे फोटो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून न्‍या. रविंद्र घुगे आणि न्‍या. संजय देशमुख यांच्‍या खंडपीठात सादर करण्‍यात आले.  

तर बीडबाय पास उड्डाणपुलाच्‍या दोन्‍ही बाजूंना ड्रेनेज पाईप लाईन टाकायची असल्याने खोदकाम सुरु आहे. तसेच दोन्‍ही रस्‍त्‍यांची कामे करायची असल्याने तो रस्‍ता ८ मार्चपर्यंत बंद राहणार असल्याचे देखील न्‍यायालयाच्‍या निदर्शनास आणुन देण्‍यात आले. शहरात आणखी नादुरूस्‍त रस्‍त्‍यांसंदर्भात माहिती असल्यास ती न्‍यायालयात सादर करावे असे आदेश खंडपीठाने जनहित याचिकेतील पार्टी इन पर्सन अॅड. रुपेश जैस्‍वाल यांना दिले.या प्रकरणी शासनातर्फे सहायक सरकारी वकील ॲड. सुजित कार्लेकर, ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र देशमुख, ॲड. नावंदर, ॲड. रूपेश जैस्वाल आदींनी काम पाहिले.