औरंगाबाद – शिर्डी रस्त्याचे डिपीआर, अखंड उड्डाणपुलाचे तांत्रिक सर्वेक्षण व औट्रम बोगद्यासह पर्यायी रस्त्याचे अहवाल सादर करा – अलोक कुमार

खासदार इम्तियाज जलील यांनी मागणी व सुचित केलेल्या मुद्दंयाना सकारात्मक प्रतिसाद, एनएचएआय विभागाच्या वरिष्ठांनी त्वरीत दिले कार्यवाहीचे आदेश

औरंगाबाद,११ जुलै /प्रतिनिधी :- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे केंदीय सदस्य तथा महाराष्ट्राचे प्रभारी अलोक कुमार, नागपुर क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल आणि खासदार इम्तियाज जलील यांची चिकलठाणा विमानतळ दालनात औरंगाबाद जिल्ह्यातील एनएचएआय मार्फत प्रस्तावित व प्रगतीपथावरील प्रकल्पावर महत्वपुर्ण बैठक पार पडली. सदरील बैठकीत चर्चेदरम्यान खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद ते शिर्डी रस्ता चौपदरीकरण, लेमनट्रि हॉटेल चौक ते केम्ब्रिज शाळेपर्यंत अखंड उड्डाणपुल आणि सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड येथील औट्रम बोगद्यासह पर्यायी रस्ता देण्यात यावे अशी मागणी केली. औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिने आणि नागरीकांची मागणी व गरज लक्षात घेता सदरील प्रकल्प अतिमहत्वाचे असल्याने सविस्तर लेखी पत्रासह इतर संबंधित कागदपत्रे सुध्दा दिली.

खासदार इम्तियाज जलील यांनी मागणी व सुचित केलेले प्रकल्प व कामे औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिने अतिमहत्वाचे आणि जनहिताचे असल्याने भारतीय राष्ट्रीय राजमार्गचे केंद्रीय सदस्य तथा महाराष्ट्राचे प्रभारी अलोक कुमार यांनी प्रकल्प संचालक अरविंद काळे यांना औरंगाबाद ते शिर्डी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी तांत्रिक सर्वेक्षण करुन वाहतुक आणि तांत्रिक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. औरंगाबाद शहराचे व औद्योगिक क्षेत्राचे विकास होत असतांना वाहतुकीच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचे असलेले लेमनट्रि हॉटेल चौक ते केम्ब्रिज शाळेपर्यंत अखंड उड्डाणपुल बांधण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त व इतर संबंधित विभागासोबत संयुक्तरित्या बैठक घ्यावी तसेच स्थळ पाहणी व तांत्रिक सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्यात यावे तसेच सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या तिसऱ्या पॅकेजचा सर्वात महत्वाचा टप्पा असलेल्या कन्नड येथील डोंगर पोखरुन औट्रम घाटातील बोगदा तयार करतांना नैसर्गिक साधनसामुग्रीला अधिक नुकसान न देता वाहतुकीस इतर पर्यायी रस्ता सुध्दा तयार करण्यासाठी त्वरीत अहवाल तयार करुन सादर करण्याचे निर्देश दिले.

खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर अलोक कुमार यांनी त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने औरंगाबाद विभागाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी चर्चेदरम्यान व दिलेल्या पत्रात नमुद केलेल्या सर्व मुद्दयांवर त्वरीत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी नागपूरचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल व इतर संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

May be an image of 1 person, map and indoor

खासदार इम्तियाज जलील यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे दिल्ली येथील प्रकल्प संचालक, केंद्रीय सदस्य तथा महाराष्ट्राचे प्रभारी अलोक कुमार, क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल व औरंगाबाद विभागाचे प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की, चिकलठाणा विमानतळाजवळ एनएचएआय तर्फे तयार करण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाला विरोध दर्शविण्यासाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व एआयएमआयएमच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी लेखी पत्र दिलेले आहे. सध्या तेथे रहदारीची कोंडी होत नाही, तर जालना रोडवरील जास्त गर्दी असलेल्या अमरप्रीत चौकात तातडीने उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. औद्योगिक संस्था, पोलीस विभाग व अन्य संस्थांनीही अमरप्रीत चौकात उड्डाणपुलाची मागणी केलेली आहे. तसेच विभागीय आयुक्तांनीही अमरप्रीत चौकात उड्डाणपुलाची मागणी करणारे पत्र पाठविलेले आहे. औरंगाबाद विभागातील एनएचएआय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन त्याठिकाणी उड्डाणपुल तयार करणे हे एक खर्चिक काम असल्याचे नमुद केले. एनएचएआय विभागाव्यतिरिक्त इतर तज्ञ डिझायनरकडून अभ्यासपुर्ण सर्वेक्षण करुन घेतले. त्यांच्या अहवालानुसार अमरप्रीत चौकात उड्डाणपूल करणे शक्य आहे, त्याबाबचे रेखाचित्र सादर केलेले आहे. एनएचएआय अधिकारी नमुद करत असलेल्या किमती पेक्षा जास्त किमती सुध्दा लागणार नाही. तथापि अधिक तपशिलात न जाता, शहराच्या मागण्या व गरजा कृपया लक्षात घेण्याची विनंती खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात नमुद केली आहे. जर चिकलठाणा विमानतळ येथे उड्डाणपुल तयार झाला तर भविष्यात जालना रोडवरील लेमनट्री हॉटेल चौक ते केम्ब्रिज शाळेपर्यंत एक मोठा व अखंड उड्डाणपूल तयार करु शकणार नाही. अखंड उड्डाणपुल तयार झाल्यास शेंद्रा येथे होत असलेल्या पंचतारांकित औद्योगिक क्षेत्राचे विकास आणि ऑरिक सिटी करिता अतिमहत्वाचे ठरेल. अमरप्रीत चौकात उड्डाणपुल तयार करण्यात यावे यासाठी एनएचएआय आणि इतर पर्यायी तज्ञांकडून तयार करण्यात आलेल दोन्ही रेखाचित्रे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रासोबत दिल्याचे नमुद केले.*खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात प्रामुख्याने औरंगाबाद ते शिर्डी रस्त्याचे चौपदरीकरण, औट्रम घाट व शेंद्रा-बिडकीन कनेक्शन बाबत सविस्तर माहिती व त्याचे महत्व नमुद केले.

औरंगाबाद – शिर्डी रस्ता मी यापूर्वीच हा मुद्दा उपस्थित केलेला आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी आणि संसदेत सभागृहाच्या बैठकीतही मागणी केली. औरंगाबाद – शिर्डी रस्त्याचे चौपदरीकरण करणे अतिमहत्वाचे आहे, कारण औरंगाबादहून शिर्डीला भेट देणाऱ्या भाविकांचा प्रचंड प्रवाह असल्याने वाहतुकीचा विचार करणे आवश्यक आहे. रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी फक्त ३० मिटर रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी काही ठिकाणी अतिरिक्त भूसंपादनासह आवश्यक असल्यास बायपास काढण्याची आवश्यकताच असणार असल्याचे नमुद केले.

औट्राम घाट

वेगवेगळ्या जिल्ह्यांना जोडण्यासाठी नागरीकांची ही मागणी दीर्घकाळापासुन प्रलंबितच आहे. नियमितपणे रहदारी करण्यासाठी वाहतुकीची कोंडी होवुन तासनतास ताटकळत राहणे हे एक वैशिष्ट्य बनले आहे. याशिवाय दुसरा पर्याय नाही, परंतु औट्रम घाटात बोगदा तयार करण्याशिवाय दुसरा पर्याय हि नाही, त्वरीत पर्यायी रस्ता सुध्दा तयार करण्याविषयी सकारात्मक निर्णय घेण्याचे नमुद केले.*शेंद्रा – बिडकीन कनेक्शन : हे देखील फार महत्वाचे आहे कारण यामुळे दोन भरभराटीच्या औद्योगिक वसाहती जोडल्या जातील. शेंद्रा-बिडकीन दरम्यान जोडणीचा रस्ता तयार करण्याची अत्यंत आवश्यक गरज लक्षात घेता सदरील प्रकल्पावर सुध्दा सकारात्मक निर्णय घेण्याचे पत्रात नमुद केले आहे.