महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

औरंगाबाद,१४ जानेवारी / प्रतिनिधी :-  डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेच्या सहकार्यातून शिक्षण संस्था  केल्या.  सर्वसामान्य माणसांच्या घामाच्या परिश्रमातून उभ्या केल्या. तर दुसरीकडे राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सतत महापुरुषांचा अवमान केला जातोय. महापुरुषांचं अवमान करणाऱ्या या प्रवृत्तींना घरचा रस्ता दाखविण्याचा संकल्प आजच्या नामविस्तार दिनी आपल्याला करावा लागेल आणि डॉ.बाबासाहेबांच्या राज्यघटनेचं संरक्षण करून त्याच संवर्धन करण्याची भूमिका घ्यावी लागेल असे मत विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यावेळी व्यक्त केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानाची या देशात कशा पद्धतीने चिरफाड करून अवमान केला जात आहे. या उलट  उद्धवजी ठाकरे , अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या महविकास आघाडीच्या सरकारने सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घेतली. 

या ऐतिहासिक शहरात याच ठिकाणी विद्यापीठ होण्याचे स्वप्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बघितल होत. हे स्वप्न साकार होऊन मराठवाडा विद्यापीठ साकारलं गेलं. याच दिवशी नामविस्तार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं करण्यात आल्याच दानवे म्हणाले. 

ज्या महापुरुषांनी शिक्षणाची दारे सर्व सामान्यांसाठी खुली करून दिली, अशा महापुरुषांबद्दल आताच्या सरकार मधील एक मंत्री शिक्षण संस्था चालविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भिक मागितली. असं म्हणणाऱ्या मंत्र्यांना ही जनता भीक मागायला लावणार आहे लक्षात ठेवा, असा इशारा दानवे यांनी दिला.

या प्रसंगी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, शिवसेना उपनेत्या सुषमाताई अंधारे, आ.सतिष चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कल्याण काळे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, माजी  महापौर नंदकुमार घोडेले, प्रा. सुनील मगरे, शिवसेना उप जिल्हाप्रमुख बाळासाहेब थोरात, संतोष बोर्डे आदींची उपस्थिती होती.