अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीची शिक्षा सत्र न्‍यायालयात कायम

औरंगाबाद ,१७ जून /प्रतिनिधी :-मैत्रिणीसोबत घराबाहेरील पलंगावर झोपलेल्या अल्पवयीचा विनयभंग करणारा आरोपी कौतिक दगडुबा जोगदंडे (५०, रा. न्‍यू बालाजीनगर) याला प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी ठोठावलेली तीन महिने सक्तमजुरी आणि दहा हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा व सत्र न्‍यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांनी कायम ठेवली.

प्रकरणात अल्पवयीन मुलीच्‍या आईने फिर्याद दिली होती. त्‍यानूसार १५ मे २०१० रोजी पीडिता ही आपल्‍या मैत्रिणीसह घराबाहेरील पलंगावर झोपलेली होती. पहाटे साडेपाच वाजेच्‍या सुमारास आरोपी तेथे आला व त्‍याने पीडितेशी अश्लिल चाळे सुरु केले. या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने ओरडतच घराकडे पळ काढला. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला.

खटल्याच्‍या सुनावणीनंतर प्रथमवर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी आरोपीला २८ सप्‍टेंबर २०१५ रोजी तीन महिन्‍यांची सक्तमजुरी आणि दहा हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा ठोठावली. या शिक्षे विरोधात आरोपीने सत्र न्‍यायालयात अपील दाखल केले होते. अपीलावरील सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता सुनिलकुमार बर्वे यांनी सर्वोच्च न्‍यायालयाचे न्‍याय निवाडे सादर केले. सुनावणी अंती न्‍यायालयाने प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी यांनी आरोपीला ठोठावलेली शिक्षा कायम ठेवली