मृत व्यक्तीच्या नावावर फायनान्स कंपनी कडून कर्ज घेतले ; वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

वैजापूर,२३ऑक्टोबर /प्रतिनिधी :- रेल्वेसमोर आत्महत्या केलेल्या तालुक्यातील भटाणा येथील युवकाचे आधार, मतदान कार्ड व फोटोचा वापर करून त्याच्या जागी दुसऱ्याला उभे करत मायक्रो फायनान्समधून 40 हजार रुपये काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी 6 जणांवर वैजापूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून यात ५ महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गावातील एका महिलेनेच हे कर्ज उचलले आहे. दुलारीबाई नक्षत्रकुमार दुर्वे, व्दारकाबाई कडुबा जाधव, प्रतिभा गजानन महेर, सुनिता भाऊसाहेब जाधव, सुनिता ज्ञानेश्वर घोगरे व युवराज सुभाष पवार ( सर्व रा. भटाणा, ता. वैजापूर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

वैजापूर तालुक्यातील भटाणा येथील दगडू अरुण घोगरे ( वय 23 वर्ष ) यांनी 3 सप्टेंबर रोजी रोटेगाव रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेसमोर आत्महत्या केली होती. मात्र या मृताचे आधार, मतदान व फोटोचा वापर करून गावातील सुनीता घोगरे या महिलेने आशीर्वाद फायनान्समधून कर्ज घेतल्याचे अरुण घोगरे यांना समजले. त्यामुळे त्यांनी भाऊ विठ्ठल घोगरे व गावातील पंजाब जाधव यांच्यासोबत आशीर्वाद मायको फायनान्समध्ये जावून चौकशी केली. त्यात सुनिता घोगरे यांनी ६ सप्टेंबर रोजी मृताचे ओळखपत्र व फोटोचा वापरत गावातील युवराज पवार याला दगडू घोगरे भासवून बचतगटाचे 40 हजार रुपयांचे कर्ज काढले. यासाठी साक्षीदार म्हणून गावातीलच दुलारीबाई दुर्वे, व्दारकाबाई जाधव, प्रतिभा महेर व सुनिता जाधव यांनी सह्या केल्या. हा प्रकार लक्षात आल्यावर अरुण घोगरे यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली होती. त्याची चौकशी केली असता सुनिता घोगरे हिने युवराज पवार याला मृत दगडू घोगरेचे नाव व कागदपत्रे वापरत खोट्या सह्या करून आशीर्वाद फायनानमधून 40 हजार रुपये कर्ज घेतल्याचे स्पष्ट झाले.  

दगडू घोगरे हा मृत झाल्याचे माहिती असूनही गावातील चौघींनी साक्षीदार म्हणून कर्ज मागणी अर्जावर सह्या केल्या. या प्रकरणी अरुण रामहरी घोगरे यांच्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दगडू घोगरे याने आत्महत्या केल्यावर तिसऱ्या दिवशी त्याच्या नावाचा वापर करत मायक्रो फायनान्समधून 40 हजार रुपयांचे कर्ज उचलण्यात आले आहे.