पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्ते  रोजगार मेळा सुरू – 10 लाख कर्मचार्‍यांसाठी भरती मोहिमेला केला प्रारंभ

  • आमच्या कर्मयोगींच्या प्रयत्नांमुळे सरकारी विभागांची कार्यक्षमता वाढली आहे”
  • “गेल्या 8 वर्षात केलेल्या सुधारणांमुळे आज भारत 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे”
  • “स्वयंरोजगार कार्यक्रमाच्या मुद्रा योजनेला इतके विशाल स्वरूप यापूर्वी कधीही देशात प्राप्त झाले नव्हते”
  • ‘’देशातील तरुणांना आमची सर्वात मोठी शक्ती आम्ही मानतो”
  • “केंद्र सरकार अधिकाधिक नोकऱ्या निर्माण करण्यासाठी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम करत आहे”
  • “21 व्या शतकातील भारतातील सरकारी सेवा म्हणजे कोणतीही सेवा तसेच काम वेळेत पूर्ण करण्याची वचनबद्धता आहे”
  • ‘’ज्यावेळी तुम्ही कार्यालयाच्या दारातून आत प्रवेश करणार आहात, त्यावेळी   तुमच्या ‘कर्तव्य पथाचे’ स्मरण  ठेवले पाहिजे’’

नवी दिल्ली ,२२ऑक्टोबर /प्रतिनिधी :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्‍य प्रणालीद्वारे रोजगार मेळा – 10 लाख कर्मचार्‍यांसाठी भरती मोहिमेचा प्रारंभ केला. या समारंभात 75,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

नियुक्त करण्‍यात आलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन  करताना, पंतप्रधान मोदी यांनी प्रारंभी  धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या. “आजचा दिवस विशेष आहे,  कारण या दिवशी रोजगार मेळ्याच्या रूपाने एक नवीन दुवा देशातील रोजगार आणि स्वयंरोजगार मोहिमेशी जोडला जात आहे. या मोहिमा गेल्या 8 वर्षांपासून देशात सुरू आहेत”,  असे ते म्हणाले. स्वातंत्र्याची 75 वर्षे लक्षात घेऊन केंद्र सरकार या एका कार्यक्रमांतर्गत 75,000 तरुणांना नियुक्ती पत्र देत आहे. रोजगार मेळ्याचे कारण स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले की,  “आम्ही ठरवले की एकाच वेळी नियुक्तीपत्रे देण्याची परंपरा सुरू करावी, त्यामुळे  प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा सामूहिक भावना सर्व विभागांमध्ये विकसित होईल”.  आगामी काळातही उमेदवारांना शासनाकडून वेळोवेळी नियुक्तीपत्रे मिळणार आहेत, असेही मोदी म्हणाले. “मला आनंद आहे की, अनेक एनडीए -शासित आणि भाजपशासित राज्यांसह केंद्रशासित प्रदेश देखील यापुढे अशाच प्रकारचे मेळे आयोजित करतील “, असे ते पुढे म्हणाले.

आज नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांचे स्वागत करून या उमेदवारांच्या दृष्‍टीने एक महत्वाची गोष्‍ट अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, अमृत काळामध्ये  तुम्हा सर्वांची नियुक्ती होत आहे. विकसित भारताच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी, आपण स्वावलंबी भारताच्या मार्गावर पुढे जात आहोत. भारताला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेण्यात नवोन्मेषी, उद्योजक, उद्योगपती, शेतकरी आणि  उत्पादन तसेच सेवा क्षेत्रातील लोकांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.  ‘सबका प्रयास’चे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, या प्रवासात प्रत्येकाचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत आणि जेव्हा सर्व महत्त्वाच्या सुविधा सर्वांपर्यंत पोहोचतील तेव्हाच ‘सबका प्रयास’ची ही भावना सार्थ ठरणार आहे.

लाखांच्या घरात संख्या असलेली पदे, त्यांच्या निवडीची प्रक्रिया काही महिन्यातच पूर्ण करून त्यांना नियुक्तीपत्रे दिले जातात हे गेल्या सात-आठ वर्षात सरकारी पद्धत ज्या बदलातून जात आहे त्याचं निदर्शक आहे असं ते म्हणाले. आज कामाची पद्धत बदलत आहे. सरकारी खात्यांमध्ये आपल्या कर्मयोगींमुळे कार्यक्षमता वाढीला लागली आहे. आधी सरकारी नोकरीसाठी अर्ज करणे ही एक किचकट प्रक्रिया होती त्याशिवाय निवड करताना सर्रास पक्षपात आणि भ्रष्टाचार चालत असे, असे पंतप्रधान म्हणाले. आपल्या सरकारच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये केंद्र सरकारी नोकऱ्यांत प्रमाणीकरण आणि गट क आणि गट या पदांमध्ये मुलाखती नसणे या गोष्टीं तरुणांना सहाय्यकारी ठरल्या असं त्यांनी नमूद केलं.

आज भारत ही पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. गेल्या आठ वर्षात केलेल्या सुधारणांमुळे हे ध्येय साध्य करता आले. दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेल्या सात-आठ वर्षात आपण झेप घेतली, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले. देशाला आव्हान देणाऱ्या आर्थिक आव्हानांची व्याप्ती पाहताना भारत याचे नकारात्मक परिणाम बऱ्याच प्रमाणात रोखू शकतो असे पंतप्रधान म्हणाले.  हे गेल्या आठ वर्षात आपण भारत देशाच्या अर्थव्यवस्थेतील त्रुटींपासून मुक्तता मिळवल्यामुळेच हे शक्य झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. शेती, खाजगी क्षेत्र, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र या रोजगार प्रोत्साहनपर क्षेत्रांवर भर देत पंतप्रधानांनी उज्वल भविष्यासाठी भारतातील तरुणांना कौशल्यपूर्ण बनवण्याचं महत्त्व अधोरेखित केलं. आज आपण तरुणांमध्ये कौशल्य विकसित करण्यावर भर देत आहोत असे प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या अंतर्गत देशातील उद्योगधंद्यांच्या गरजेनुसार तरुणांना शिक्षण देण्यासाठी भव्य मोहीम सुरू आहे, असे ते म्हणाले. स्किल इंडिया अभियानांतर्गत 1.25 कोटी युवकांना प्रशिक्षण मिळाले आहे. कौशल विकास केंद्र देशभरात सर्व ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे शेकडोंनी उच्च शिक्षण संस्था उघडल्या गेल्या आहेत. ड्रोन धोरणाला मुक्त करण्यासाठी घेतलेला पुढाकार, अंतराळ धोरण मुक्त ठेवणे. रोजगार मुद्रा योजनेअंतर्गत वीस लाख कोटी रुपयांच्या कर्जांचे वितरण अशा गोष्टींमुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली असेही ते म्हणाले. याआधी कुठलाही स्वयंरोजगार कार्यक्रम इतक्या मोठ्या प्रमाणावर राबवला गेला नव्हता असेही ते म्हणाले.

बचत गटांखेरीज खादी आणि ग्रामोद्योग ही ग्रामीण भागात निर्माण झालेल्या रोजगारांची उदाहरणे आहेत. देशात पहिल्यांदाच खादी आणि ग्रामीण उद्योगांनी चार लाख कोटींचा आकडा पार केला आणि चार कोटींपेक्षा रोजगार या खादी आणि ग्रामोद्योग मध्ये निर्माण झाले. मोठ्या संख्येने असलेल्या आमच्या भगिनींचा यात मोठा वाटा आहे, असं ते म्हणाले. स्टार्टअप इंडिया मोहीमेने देशभरातील तरुणांची क्षमता जगात सिद्ध केली असेही पंतप्रधानांनी नमूद केले. त्याचप्रमाणे लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांनी दीड कोटी रोजगार निर्माण करून महामारीच्या दिवसात मोठे सहाय्य केले.

‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ हे देशाचे एकविसाव्या शतकातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. आज देश मोठ्या प्रमाणावर आयातीपासून मोठ्या प्रमाणावर निर्यात याकडे आला आहे. अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यामध्ये भारत वेगाने वैश्विक केंद्र बनण्याच्या वाटेवर आहे, असे ते म्हणाले. उच्चांकी निर्यात हे रोजगार सुद्धा प्रचंड वेगाने वाढत असल्याचे निदर्शक आहे.

उत्पादन आणि पर्यटन क्षेत्र मध्ये वाढ करण्याकडे करण्यावर सरकार सर्व परीने काम करत आहे असे सांगत कंपन्यांना जगभरातून कुठेही भारतात येण्यासाठी कारखाने वसवण्यासाठी आणि जगभरातून येणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना अवलंबावी लागणारी प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे. उत्पादकतेवर प्रोत्साहन बोनस देणारी योजना सरकारने सुरू केली. जास्त उत्पादन जास्त बोनस हे भारताचे धोरण आहे. याचे परिणाम बऱ्याच क्षेत्रांमध्ये दिसून येत आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून मिळत असलेली माहिती बघून गेल्या काही वर्षात रोजगाराच्या बाबतीतील सरकारी धोरणांमुळे परिस्थिती कितीतरी सुधारली आहे हे दिसून येते. याच आकडेवारीनुसार दोन दिवसांपूर्वी आलेल्या माहितीवरून या वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात जवळपास 17 लाख लोकांनी भविष्य निर्वाह निधी कार्यालय सदस्यत्व घेतले आणि ते आता देशाच्या अधिकृत अर्थव्यवस्थेचा भाग बनले आहेत असे नमूद करून त्यांनी यापैकी जवळपास आठ लाख अठरा ते पंचवीस या वयोगटातील असल्याचे माहिती त्यांनी दिली.

पायाभूत सुविधा निर्मितीतून रोजगार निर्मितीच्या पैलूवर पंतप्रधान मोदी यांनी प्रकाश टाकला. संपूर्ण देशभरात गेल्या 8 वर्षांत हजारो किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले  आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच देशभरात दुहेरीकरण, रेल्वेमार्गाचे रूंदीकरण आणि रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण अशी कामे सुरू सातत्याने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी पुढे असेही सांगितले की, देशात नवीन विमानतळ बांधण्यात येत असून रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच नवीन जलमार्गही तयार केले जात आहेत. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत तीन कोटीहून अधिक घरे बांधण्यात आली आहेत, असे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिली की, केंद्र सरकार देशात अधिकाधिक रोजगार निर्माण करण्यासाठी इतक्या आघाड्यांवर एकाचवेळी काम करत आहे. पंतप्रधान म्हणाले की, भारत सरकार पायाभूत सुविधांसंदर्भात शंभर लाख कोटी रूपयांहून अधिक गुंतवणुकीच्या लक्ष्यासह काम करत आहे. विकासकामे प्रचंड मोठ्या प्रमाणावर केली जात असून त्यातून स्थानिक स्तरावर तरूणांना लाखो नोकर्या उपलब्ध होत आहेत, असे त्यांनी नमूद केले. पंतप्रधानांनी देशभरात श्रद्धास्थळे, अध्यात्मिक स्थाने आणि ऐतिहासिक महत्वाची स्थळे यांचा विकास केला जात असल्याची उदाहरणे दिली. आधुनिक पायाभूत सुविधांसाठी ही कामे केली जात असून ती पर्यटन क्षेत्राला नवीन उर्जा देत आहेत आणि दुर्गम भागातील युवकांनाही रोजगाराच्या संधी तयार करत आहेत.

पंतप्रधान म्हणाले की भारताची सर्वात मोठी शक्ती ही देशाच्या तरूणांमध्ये आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवात भारत हा देश विकसित राष्ट्र बनवण्यासाठी या प्रेरक चालक शक्ती आहेत. पंतप्रधानांनी नवीन नियुक्त झालेल्या तरूणांनी कार्यालयाच्या दरवाजात प्रवेश करताना नेहमी कर्तव्य पथ आपल्या मनांमध्ये जपून ठेवावा, असे आवाहन केले. देशाच्या नागरिकांप्रती सेवा देण्यासाठी तुमची नियुक्ती करण्यात येत आहे. असे पंतप्रधान म्हणाले. 21 व्या शतकाच्या भारत सरकारमध्ये नोकरी ही केवळ सुविधा नाही तर एक कटिबद्धता आहे आणि देशाच्या प्रत्येक कानाकोपर्यातील लोकांची कालबद्ध मुदतीत करण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे, असं सांगत पंतप्रधानांनी समारोप केला.

पार्श्वभूमी

आजचा उपक्रम हा देशातील तरूणांना रोजगार पुरवणे आणि नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधानांनी व्यक्त केलेली सातत्यपूर्ण वचनबद्धता पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असेल. पंतप्रधानांच्या निर्देशांनुसार, सर्व मंत्री आणि विभाग मंजूर केलेली सर्व रिक्त पदे भरण्य़ासाठी मिशन मोडमध्ये काम करत आहेत.

देशभरात निवडून भरती करण्यात आलेले नवीन कर्मचारी 38 मंत्रालये आणि विभागांमध्ये सामावून घेतले जातील. सर्व नवीन नियुक्ती करण्यात आलेले विविध स्तरांवर जसे की गट अ, गट ब (राजपत्रित), गट ब (अराजपत्रित) आणि गट क या स्तरांवर सरकारी सेवेत रूजू होतील. ज्या पदांवर निय़ुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये केंद्रीय सशस्त्र दले, उपनिरीक्षक, कॉन्स्टेबल, कनिष्ठ लिपीक (एलडीसी), आशुलिपीक, स्वीय सचिव, प्राप्तीकर निरीक्षक आणि एमटीएस यांचा समावेश आहे.

ही कर्मचारी भरती मंत्रालये आणि विभागांनी त्यांनी स्वतःच किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य निवड मंडळ आणि रेल्वे भरती मंडळ यांच्यामार्फत मिशन मोडमध्ये केली आहे. निवड प्रक्रिया अगदी सुटसुटीत केली असून भरती जलदरित्या होण्यासाठी तंत्रज्ञानाचे सहाय्य घेण्यात आले होते.