बांधकामावरील लोखंडी गज चोरणाऱ्या दोघांना अटक

औरंगाबाद,२६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  बांधकामावरील ४८ हजार रुपये किंमतीच्‍या लोखंडी गज चोरणाऱ्या  दोघांना छावणी पोलिसांनी शनिवारी दि.२५ सायंकाळी अटक केली. त्‍यांच्‍याकडून चोरलेले गज आणि गुन्‍ह्यात वापरलेला छोटाहत्ती टेंम्पो‍ (क्रं. एमएच-२०-सीटी-१९६३) पोलिसांनी हस्‍तगत केला आहे.

सय्यद फहिम सय्यद नसीर (२०, रा. कासंबरी दर्गा, पडेगाव) आणि शेख मेहराज शेख चॉंद (२०, रा. नारायणपुर रोड, वाळुज ता. गंगापुर) अशी आरोपींची नावे असुन त्‍यांना सोमवारपर्यंत दि.२७ पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी.एम. भांडे यांनी रविवारी दि.२६ दिले.

प्रकरणात पडेगाव येथील गट नं.९२ येथे राहणारे जमीर बाबर पठाण (३०) यांनी फिर्याद दिली. त्‍यानूसार, फिर्यादीचे मिटमिटा येथील कुरेशी पार्क परिसरात घराचे बांधकाम सुरु आहे. घराच्‍या बांधकामासाठी त्‍यांनी २० जानेवारी रोजी एक लाख ६१ हजार रुपये किंमतीचे गज आणले, असून ते बांधकामाच्‍या ठीकाणी मोकळ्या जागेत ठेवलेले होते. फिर्यादीचे वडील त्‍याची देखरेख करित होते. २४ फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजेच्‍या सुमारास बांधकाम संपल्यावर कामगार आणि फिर्यादी घरी गेले होते, तर फिर्यादीचे वडील बांधकामच्‍या ठीकाणी झोपी गेले. संधी साधत चोरट्यांनी ४८ हजार रुपये किंमतीचे आठ टन गज चोरुन नेले. सकाळी सात वाजेच्‍या सुमारास फिर्यादी घराला पाणी मारण्‍यासाठी गेले तेव्‍हा गज चोरीला गेल्याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले. प्रकरणात छावणी पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला. मिळालेल्या माहिती आधारे पोलिसांनी वरील दोघांना अटक केली. त्‍यांनी सोहेल आणि शेख आमन यांच्‍या साथीने चोरी केल्याची कबुली दिली.

आरोपींना आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी आरोपींच्‍या साथीदारांना अटक करायची आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी किती गुन्‍हे केले याचा तपास करायचा असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्‍याची विनंती न्‍यायालयाकडे केली.