वैजापूर शहरातील प्रकार ; तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी गुरुजींचे ‘चाळे’, संस्थाचालकाकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

वैजापूर,२३ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील एका शैक्षणिक संस्थेत इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीशी ‘चाळे’ करणाऱ्या गुरूजींचा ‘प्रताप’ संस्थाचालकांसह शाळेतील सहकाऱ्यांनी ‘रफादफा’ केला. प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेले. ऐनवेळी तक्रार देण्यासाठी कुणीही न धजावल्याने गुरूजींचे हे ‘कृत्य’ झाकून राहीले. परंतु असे असले तरी ‘त्या’ शाळेसमोर झालेला ‘राडा’ व पोलिसांच्या ताफ्यामुळे गुरूजींचा हा प्रताप झाकून न राहता शहरभर त्याची चर्चा सुरू आहे. 

शहरातील खानगल्लीत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत उर्दू शाळा असून गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका गुरूजींच्या कुकृत्यामुळे ही शाळा चांगलीच चर्चेत आली आहे. या आंबटशौकीन बहाद्दर गुरूजीने इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीशी ‘चाळे’ करून शाळेच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली आहे. हा प्रकार जेव्हा मुलीच्या घरातील सदस्यांना कळाल्यानंतर त्यांनी थेट शाळा गाठून शालेय व्यवस्थापनाला जाब विचारला. एवढेच नव्हे तर शाळेच्या आवारात उभे राहून गुरूजींना यथेच्छ शिव्यांची लाखोलीही वाहिली.  तोपर्यंत संबधित प्रतापी गुरूजीने शाळेतून धूम ठोकली होती. व्यवस्थापनाकडे गुरूजीने केलेल्या कृत्याचे कोणतेही उत्तर नव्हते. हा प्रकार सुरू असतानाच शाळेच्या परिसरात संतापलेल्या नागरिकांची तोबा गर्दी झाली.

नागरिकांची गर्दी झाल्यामुळे शाळेतील अन्य गुरूजींना पोलिसांना पाचारण करण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यानंतर पोलिसांनी शालेय परिसरात जाऊन गर्दी पांगवून त्या मुलीच्या नातलगांना वैजापूर पोलिस ठाण्यात नेले. ते ठाण्यात गेल्यानंतर संबधित संस्थाचालकांसह अन्य शिक्षक व काही नेत्यांनी शाळेची अब्रू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून ‘त्या’ मुलीच्या नातलगांची मनधरणी सुरू केली. वास्तविक पाहता पोलिस यंत्रणाही त्या प्रतापी गुरूजीविरुध्द गुन्हा दाखल करण्यासाठी सज्ज होती. परंतु संस्थाचालकांसह सर्वांनीच नातलगांना विनवणी केल्यामुळे नातलगांनी माघार घेतली. पर्यायाने झाकली मूठ सव्वा लाखाची राहून गुरूजी अन् शाळेची अब्रू वाचली.

पोलिस ठाण्याच्या नोंदीवर जरी ही बाब आली नसली तरी दुसरीकडे शाळेसमोरच सार्वजनिक ठिकाणी हा ‘राडा’ झाल्याने शहरातील नागरिकांपासून ही गोष्ट झाकून राहीली नाही.उलट गुरुजींनी केलेल्या या ‘शाळाबाह्य’ कामाची चर्चा जास्त प्रमाणात झाली. समाज माध्यमांवरही संदेश प्रसारित होऊन गुरूजींच्या प्रतापाचे ‘चर्वितचर्वण’ झाले. संस्थाचालकांसह सहकाऱ्यांनी गुरूजींचे कृत्य ‘हलक्यात’ घेऊन नातलगांना विनवणी करीत ‘दवा’ देऊन ‘गोटी’ फीट केल्याची चर्चा सुरू आहे.