निधीअभावी रखडलेली कामे भविष्यात पूर्ण करणार – खा. जलील

खा.जलील यांचा वैजापूर तालुका दौरा

वैजापूर,७ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- मी कुणा एका समुदायाचा प्रतिनिधी नाही तर जिल्ह्यातील सर्व जनतेचा लोकप्रतिनिधी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात निधीअभावी रखडलेली विकासकामे भविष्यात पूर्ण करणार असल्याचा खुलासा जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी (ता.06) त्यांच्या वैजापूर भेटी दरम्यान केला. या भेटी दरम्यान त्यांनी नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत माहिती घेतली. याशिवाय येथील वकील संघाच्या कार्यालयालाही भेट दिली. 

     खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी दुपारी शहरासह तालुक्याचा दौरा करताना शिऊर, मनूर, खंडाळा, वडजी, लाडगाव, लासुरगांव आदी ठिकाणी पक्ष पदाधिकारी, शेतकरी व नागरिकांच्या भेटी घेतल्या.

खासदार जलील यांनी येथील येवला रोडलगत असलेल्या एका व्यापारी संकुल परिसरात नागरिकांची भेट घेतली. यावेळी मुस्लिम बांधवानी वक्फ बोर्डच्या जमिनीवर असलेले अतिक्रमण हटविण्याबाबत त्यांना साकडे टाकले. याशिवाय तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे व्हावेत, येथील उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या भौतिक त्रुटी दूर कराव्यात या व इतर मागण्या उपस्थितांनी खासदारांकडे केल्या. दरम्यान उपजिल्हा रुग्णालयातून रुग्णांना उठसुठ औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविल्या जाते याबाबत देखील अनेकांनी त्यांच्याकडे प्रतिक्रिया नोंदविल्या. दरम्यानच्या काळात निधी अभावी जिल्ह्यातील विकास कामांना अडचणी येत होत्या. मात्र येणाऱ्या काळात नागिरकांना अपेक्षित विकास कामे व नागरिकांचे शत प्रतिशत प्रश्न सोडवू असे आश्वासन खा.जलील यांनी  दिले. यावेळी एमआयएमचे जिलाध्यक्ष समीर बिल्डर, मुन्शी पटेल,, रफीक चिता,अनीस खान, इलियास पटेल, हाशम चाऊश, तालुकाध्यक्ष अकिल कुरेशी, शहराध्यक्ष वसीम खान, मुसा बशमलूल, हाफिज शारुख, अल्ताफ़ सौदागर, फारेज कुरेशी, जाबाज खान, मुजीब शहा आदींची उपस्थितिती होती.