दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; टोळीचा म्होरक्या वैजापूरचा, 12 दुचाकी जप्त, स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई

वैजापूर,२३ऑक्टोबर /प्रतिनिधी :- परजिल्हयासह जिल्ह्यातून दुचाकी चोरी व खरेदी करणाऱ्या चोरट्यांच्या चारजणांच्या टोळीच्या औरंगाबाद येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 6 लाख 60 रुपये किंमतीच्या 12 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. यामध्ये एका अल्पवयीन चोरट्याचा समावेश असून एकजण फरार आहे. 20 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या वैजापूरचा असल्याचे समोर आले आहे. 

पगणेश दत्तू बैरागी रा.मारवाडी गल्ली, वैजापूर, पंकज कचरु गावडे रा.येवला रस्ता, वैजापूर, विठ्ठल सोपान सोनवणे रा.स्वास्तिक टाॅवर, वैजापूर, सोनू उर्फ साहिल अनिल शिंदे रा.वानवडी, वैजापूर,संदीप अमोलीक व रामदास थोरात (रा.भोकर ता.श्रीरामपूर जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर काळे ( रा. महालगाव ) यांची मोटारसायकल १२ जून रोजी रात्रीच्या सुमारास राहत्या घरासमोरून चोरी गेली होती. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीरगाव पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील मोटारसायकल ही वैजापूर येथील गणेश बैरागी याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून  चोरी केली आहे. याशिवाय त्याने तालुक्यातील वीरगावसह नाशिक जिल्ह्यातील येवला, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा व अन्य ठिकाणीही मोटारसायकली चोरी केल्या असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रामेश्वर रेगे, पोलिस नाईक संजय घुगे,दीपेश नागझरे, शेख नदीम, नरेंद्र खंदारे आदींच्या पथकाने  गणेश बैरागी याला गुरुवारी रात्री शिताफीने ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हा गुन्हा साथीदार  पंकज गावडे, विठ्ठल  सोनवणे, सोनू उर्फ साहिल शिंदे व एका अल्पवयीन मुलाच्या  साथीने केल्याची कबुली देत वीरगाव, कन्नड, येवला, नेवासा, कोपरगाव येथून मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरीच्या मोटारसायकली या संदीप पोपट अमोलीक व रामदास उर्फ पप्पू लक्ष्मण थोरात (रा.भोकर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर )  यांना विक्री केल्याची त्याने पोलिसांना सांगितले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी  रॉयल इनफिल्ड बुलेट बजाज प्लेटिना व एक हिरो एचएफ डिलक्स अशा ३ मोटारसायकली जप्त केल्या. त्यानंतर  पोलिसांनी पंकज गावडे याच्या ताब्यातून एचएफ डिलक्स, यामाहा कंपनीची आरएक्स व एक बजाज कंपनीची प्लसर अशा 3 मोटारसायकली जप्त केल्या तर  संदीप अमोलीक व रामदास थोरात यांच्याकडून पोलिसानी 6 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

सुतावरून गाठला स्वर्ग

तालुक्यातील महालगाव येथील ज्ञानेश्वर काळे यांची दुचाकी चोरी गेल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. ही दुचाकी वैजापूर येथील गणेश बैरागी याने चोरल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी अगोदर त्याला खाक्या दाखवून त्याच्याकडून वदवून घेतले. त्याच्या साह्याने त्याच्या अन्य साथीदारांपर्यंत पोलिस यंत्रणा पोहचवून या टोळीला गजाआड केले. सुतावरून स्वर्ग गाठल्यासारखा हा प्रकार म्हणावा लागेल.