महिला पोलिस कर्मचाऱ्यांसाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण:वैजापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी महक स्वामी यांचा उपक्रम

वैजापूर,२८ डिसेंबर / प्रतिनिधी :- पोलिस दलातील महिला पोलिस अंमलदारांना सार्वजनिक ठिकाणी सक्षमपणे महिला व मुलींची सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यासाठी सहाय्यक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांनी वैजापूर, वीरगाव, शिऊर पोलिस ठाण्यातील महिला कर्मचा-यासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण उपक्रम सुरु केला आहे. 

वैजापूर पोलिस ठाण्यात सुरु केलेल्या प्रशिक्षण वर्गात सहाय्यक पोलिस अधीक्षक स्वामी यांनी इतर पोलिस कर्मचा-यासोबत मार्शल आर्टचे प्रशिक्षणाचे धडे गिरवण्यास सुरुवात केल्यामुळे महिला पोलिस कर्मचा-याचा उत्साह दुणावला. महिलांचे सार्वजनिक ठिकाणी संरक्षण करण्यासाठी पोलिस दलाने दामिनी पथक, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथक स्थापन केले आहे. या पथकात महिला व मुलींच्या सुरक्षितते करीता नियुक्त महिला पोलिस कर्मचा-यावर शाळा , महाविद्यालये, बाजारपेठ, निर्मनुष्य रस्ते, बाग, वाहनतळ, रेल्वेस्टशेन अशा ठिकाणी मुली, महिला यांच्या छेडछाडीला प्रतिबंध घालणे यासाठी कायम गस्त घालण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.त्यामु़ळे आणीबाणीच्या काळात टवाळखोर, गुंड, रोडरोमिओचा बंदोबस्त करण्यासाठी महिला कर्मचा-याना स्वरक्षणासाठी मार्शल आर्टचे प्रशिक्षण देण्याची भूमिका घेतली आहे. मार्शल आर्टच्या प्रशिक्षणामुळे महिला पोलिस अंमलदार या सक्षम आणि खंबीर बनून त्यांना अधिक प्रभावशील व प्रतिकारक्षम बनविण्याचा प्रयत्न आहे. ज्यामुळे त्या महिला व मुलींना छेडछाड  करणा-या घटनांना वेळीच आळा घालून अशा घटना रोखण्यासाठी प्रशिक्षित राहतील. तसेच संकटातील महिला व मुलगी ही महिला अंमलदारांना मैत्रीण समजून तिच्या अडचणी मनमोकळयापणे बोलू शकतील.

महिला पोलिस सक्षमीकरणाची भुमिका

मार्शल आर्टच्या माध्यमांतून महिला अंमलदार यांना स्वरक्षणासह, इतरांच्या रक्षणांची जबाबदारीसह नेतृत्व क्षमतेला सुध्दा प्रोत्साहीत करण्यासाठी प्रशिक्षणांचे आयोजन केल्याचे यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांनी सांगितले. 

छेडछाड होत असल्यास या क्रमांकावर संपर्क करा

ग्रामीण भागात महिला व मुलींना शाळा महाविद्यालय तसेच रस्त्याने जाताना येतांना कोणीही टवाळखोर त्रास देत असेल तर त्यांनी निसंकोचणे स्थानिक पोलीस ठाण्यास तक्रार करावी अथवा डायल ११२ किंवा नियंत्रणकक्ष क्रमांक ०२४०२३८१६३३ या क्रमांकावार तक्रार नोंदवावी. त्यांची माहिती गोपनीय ठेवली जाईल असे स्वामी यांनी आवाहन केले